राजगुरूनगरच्या गिर्यारोहकांनी कळसूबाई शिखरावर स्वातंत्र्य दिनी फडकावला तिरंगा

राजगुरूनगर- भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेले कळसूबाई शिखर (उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर) सर करीत डॉ.समीर भिसे, ओंकार रौंधळ, सई सावंत-रौंधळ, अमोल तेलंग, आकाश पालकर, वैष्णवी श्रीनाथ, डॉ. संदीप सरडे या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावित, राष्ट्रगीत गात, “भारत माताकी कि जय”, “वंदे मातरम” या घोषणा देत मोठ्या उत्साहात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.

टोकियो ऑलिंपिक मध्ये यश मिळवून देशाचे नाव जगात अजून उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि महपुराच्या संकटात स्वतःच्या जीवाची बाजी लावत देश सेवा करणाऱ्या एनडीआरएफ (NDRF) च्या जवानांना या ठिकाणी सलाम करून केलेली ही मोहीम भारतीय संरक्षण दलास समर्पित केली.

महाराष्ट्रात कळसूबाई शिखराचे गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. त्यात स्वातंत्र्य दिनी शिखरावर तिरंगा फडकाविला मिळणार असल्याने गिर्यारोहकांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. या मोहिमेची सुरवात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले बारी या गावातून झाली.

पहाटे चार वाजता अंधारातच या मोहिमेची सुरवात झाली. थोडे पुढे गेल्यावर एक छोटा ओढा पार करावा लागतो. वीस मिनिटांची पायपिट करून आल्यावर कळसूबाईचे मंदिर आहे. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. या ठिकाणी असलेल्या कमानीतून पुढे प्रस्थान करावे लागते.

पुढे गेल्यावर पहिल्या ३०फूटी कठीण कातळटप्प्यांवर लोखंडी शिडी असल्याने मार्गक्रमण करणे सुलभ होते तर इतर ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या वाटेनं मार्ग काढावा लागतो. दुसऱ्या कठीण कातळटप्प्यांवर तब्बल ६० फूटी अवघड टप्पा लोखंडी शिडीच्या सहाय्याने सावधानतेने पार करावा लागतो. तिसरा २५ फूटी अवघड टप्पा शिडी मुळे सुकर होतो. तर शेवटचा ३५ फूटी टप्पा आपल्याला शिखरावर घेऊन जातो.

शारीरिक कसोटी पाहणारा खड्या चढाईचा मार्ग, संततधार पाऊस, धुक्यात हरवलेला परिसर, निसरडी व चिखलमय पाऊलवाट, शेवाळलेले खडक, ओले कातळकडे, हूडहूडी भरावणारी थंडी, सोसाट्याचा वारा, कातळपायऱ्यांहुन वाहणारे खळखळते पाणी, कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य मधील दाट अंधार अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती.

अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात डॉ.समीर भिसे, ओंकार रौंधळ, सई सावंत-रौंधळ, अमोल तेलंग, आकाश पालकर, वैष्णवी श्रीनाथ, डॉ. संदीप सरडे या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावित मोठ्या उत्साहात देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.

प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन सह्याद्री खोऱ्यात साजरा

२६ जानेवारी, २०२१ रोजी आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणले जाणारे वजीर आणि वानरलिंगी सुळका एकाच दिवशी सर करीत महाराष्ट्रातील पहिलेच गिर्यारोहक होण्याचा मान मिळवून एक नवीन विक्रम करणारे डॉ. समीर भिसे यांनी १५ ऑगस्ट, २०२१ रोजी महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेले कळसूबाई शिखर सर करीत अभिमानाने तिरंगा फडकाविला. अश्या प्रकारे या वर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन डॉ. समीर भिसे यांनी सह्याद्रीच्या खोऱ्यार तिरंगा फडकावित मोठ्या उत्साहात साजरा केला.

Previous articleचाकण पोलीसांच्या सतर्कतेमुळे सर्पाला मिळाले जिवदान
Next articleवांद्रे ते गुप्त भीमाशंकर मोहीम फत्ते करून तिरंग्याला अनोखी मानवंदना