वांद्रे ते गुप्त भीमाशंकर मोहीम फत्ते करून तिरंग्याला अनोखी मानवंदना

राजगुरूनगर- 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून फोर्ट एडव्हेंचर राजगुरूनगर यांच्या वतीने वांद्रे ते गुप्त भीमाशंकर जंगल भटकंती मोहीम आयोजित करण्यात आली होती. जवळपास 8-9 तासांच्या पायपीटीनंतर ही 28- 30 किमीची मोहीम यशस्वी झाली.

रविवारी दि.15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता खेड पोलिस स्टेशन येथील ध्वजारोहणानंतर खऱ्या अर्थाने या मोहिमेला सुरुवात झाली, अन् 4-5 दुचाकींवरून खेड ते वांद्रे (ता. खेड) असा जवळपास 50 किमीचा प्रवास सुरू झाला. वरुण राजाने घेतलेल्या विश्रांती मुळे दुचाकी प्रवास थोडा सुखकर होत होता. सर्व भटके मंडळी सकाळी 9.30 वाजता वांद्रे गावात पोहोचलो अन् खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरुवात झाली.

पावसाने चांगला जोर धरला की, करड्या रंगाचा सह्याद्री अगदी हिरवागार होतो. या दिवसात भटकंतीप्रेमींच्या अंगात वेगळंच वारं संचारतं. मग अवघड, अपरिचित आणि नवनवीन वाटांवरून सह्याद्री डोंगररांगांमध्ये भटकंती करण्याचे मनसुबे रचले जातात. वांद्रे गावातून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर लागणाऱ्या खिंडीतून उतरून आम्ही पुढे चालत होतो. सकाळची वेळ, त्यात धुके अन् रिमझिम पाउस यामुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता. आमच्या साठी रस्ता तसा नवीन होता. भात खाचरे अन् खळाळणारे ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते, हा सर्व नजारा डोळ्यात साठवत आम्ही पुढे पुढे जात होतो. खरपुड गावाच्या वेशीवर पोहोचल्यावर थोडीशी विचारपूस करून आम्ही बरोबर जात आहोत ना याची खात्री करून आम्ही पुढे जात होतो. पुढे पुढे जंगल अजून घनदाट होत जाते अन् सुरू होतो चकवा. वाटेत असणाऱ्या गुराखी दादांकडून रस्ता विचारून खात्री करत होतो. भोमाळे गावाच्या हद्दीच्या पुढे गेल्यावर येळवली नावाचे छोटे आदिवासी गाव लागते. तेथे पोहोचल्यावर जरा जीवात जीव आला, कारण समोर खाली भोरगिरी परिसर दिसत होता अन् उत्तरेला तो भिमाशंकर पर्वत म्हणजे आपण बरोबर चाललोय याची पोच पावती.

तेथून पुढे उजव्या बाजूने गेल्यावर कळमजाई मंदिर लागते तेथे थोडा आराम करून पुन्हा पुढचा प्रवास चालू झाला. तेथून उजव्या हाताने एक तास पुढे गेल्यावर भोरगिरी ते भीमाशंकर रोडला पोहोचलो. तेथून पाऊल वाटेने अजून 2 किमी जंगलात गेल्यावर गुप्त भीमाशंकर च्या पवित्र शिव लिंगापाशी पोहोचलो. नुकताच पाऊस झाल्याने पाण्याचा प्रवाह जास्त होता त्यामुळे महादेवाचं दर्शन झालं नाही म्हणून मन थोडं उदास झालं. पण तेथून च त्या महा रुद्राला नमन करून मागे परतण्याचा निर्णय घेतला. जंगलात येताना मस्त चटणी भाकरीचा आस्वाद घेऊन मन तृप्त झालं. दुपारचे 3 वाजून गेले होते. मग लगेच सर्व जन धावत्या पावलाने परतीच्या वाटेवर चालत होते. अंतर जवळपास 14-15 किमीचे होते. पुन्हा तसेच ओढे नाले ओलांडत संध्याकाळी 7 च्या सुमारास परत वांद्रे गावात पोहोचलो अन् ही जंगल भटकंती मोहीम फत्ते झाली.

या मोहिमेत राजगुरुनगरचे अक्षय भोगाडे, उषा होले, ज्योती राक्षे, मयूर गोपाळे आणि पुण्यातील सचिन पुरी, रवी कुंभार, रविंद्र सहाणे, सुहास पाटील, हर्षवर्धन आदी सहकारी सामील झाले होते.

✒️शब्दांकन : अक्षय भोगाडे (राजगुरुनगर)

Previous articleराजगुरूनगरच्या गिर्यारोहकांनी कळसूबाई शिखरावर स्वातंत्र्य दिनी फडकावला तिरंगा
Next articleगांजाची तस्करी करणाऱ्या वाहनास सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले