बारामती येथे झालेल्या प्रशिक्षणात खेड तालुक्यातील ‘या’ पाच गावच्या सरपंचाचा सहभाग

राजगुरूनगर -राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत नवनिर्वाचित सरपंचांना यशदाच्या वतीने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात चार दिवस प्रशिक्षण देण्यात आले. यात खेड तालुक्यातील पाच सरपंचाची निवड झाली होती. चार दिवसाच्या या प्रशिक्षणाचा शनिवारी (ता. ७) समारोप झाला. अतिशय महत्वाची माहिती या प्रशिक्षणातून मिळाली असल्याचे दावडीचे सरपंच संभाजी (आबा) घारे यांनी दिली.

बारामती येथे 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान राज्यातील ४६ नवनिर्वाचित सरपंचांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 23 सरपंचांचा सहभाग होता. या प्रशिक्षणाला रामदास गबाजी शिंदे सरपंच गडद, गणेश बबन चौधरी सरपंच किवळे, अरूण नबन येवले सरपंच जऊळके बु,उमेश रघुनाथ रामाने  सरपंच वाफगाव, संभाजी घारे  सरपंच दावडी यांनी सहभाग घेतला होता.

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सरकारच्या विविध योजनांचा प्रभावी वापर कसा करायचा, खरेदी प्रक्रिया, जनसाक्षरता व जलव्यवस्थापन, पाण्याचे ताळेबंद, जलसंधारण, जलपुनर्वापर यासह महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अभियान, कोरोनामुक्त गाव, कोरोनाच्या अनुषंगाने करावयाची कामे, लोकसहभागाच्या अनुषंगाने आदर्शगाव संकल्पना, व्यक्तिमत्व विकास आदींबाबत प्रशिक्षण देण्यात आले. याबरोबर ग्रामीण विकासाबाबत संत साहित्य संदर्भ, सरपंचाची कामे, जबाबदारी, अंदाजपत्रकाबाबत माहिती, लेखासंहिता व सामाजिकलेखा नेतृत्वगुण, नैतिक मूल्य, विकासाची दूरदृष्टी व व्यक्तिमत्त्वविकास, प्रशासनाची पाच सूत्रे आदींसह सरपंच पदाच्या यशस्वी वाटचाली करिता प्रशिक्षण देण्यात आले.

Previous articleसंदेश वाळके यांची खेड तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
Next articleदौंड पोलिसांच्या ताफ्यात आधुनिक स्पीड बोट दाखल