शेतीतील मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड उभारून जागा बळकवण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

प्रमोद दांगट

शेतजमिनीतील मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड टाकुन तेथे महापुरुषांचे फोटो लावून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न बारामतीत झाला. जागा परत पाहिजे असल्यास पाच लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष टेकाळे (रा. कसबा, बारामती) व संजय गुलाब कोळी-कांबळे (रा. माळेगाव रोड, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सोमनाथ लक्ष्मण घाडगे (रा. घाडगेवस्ती, रुई, बारामती ) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीच्या वडिलांच्या नावे येथील कसबा भागात जमीन गट क्रमांक १२७-२ मध्ये ५ एकर १४ गुंठे शेती आहे. त्यातील २ एकर क्षेत्र मोकळे आहे. दि. १८ जुलै रोजी सायंकाळी ते शेतात ऊसपिकाची पाहणी करण्यास गेले असता मोकळ्या शेतजमिनीत संतोष टेकाळे याने १० बाय १२ फूट रुंदीच्या जागेत लोखंडी पत्राशेड उभे केलेले दिसून आले. या शेडच्या समोर महापुरुषाचा फोटो लावत झेंडा लावण्यात आला होता. त्यामुळे फिर्यादीने टेकाळे यांच्याशी संपर्क करत अतिक्रमण का केले, अशी विचारणा केली असता त्याने गुलाब सखाराम कोळी (कांबळे) यांचा मुलगा संजय गुलाब कोळी (कांबळे) याने सदर एक गुंठा क्षेत्र हे त्याचे आहे असे सांगत विकले असल्याचे सांगितले.

त्यामुळे फिर्यादीने या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या व्यक्तींना कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार दि. २१ रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी हे त्यांचा भाऊ अमर घाडगे यांच्यासह पोलीस ठाण्यात कागदपत्रे घेऊन आले. तेथे संतोष टेकाळे व संजय कोळी यांनी जागेची कागदपत्रे काढलेली नाहीत, उद्या घेऊन येतो असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे हे सर्व जण पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर टेकाळे याने ‘ही जागा मला संजय कोळी याने विकली आहे. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. जर तुम्हाला पत्राशेड काढायचे असेल तर पाच लाख रुपये द्या, नाही तर मी हात पाय मोडीन. शेडजवळ महापुरुषांचा फोटो लावला आहे. तुम्ही जर त्याला हात लावला तर तुमच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल करेन किंवा महिलेला पुढे करून विनयभंग अगर बलात्काराची खोटी केस दाखल करत तुम्हाला अडकवेन, अशी धमकी दिली. कोळी यानेही तुम्ही टेकाळेंना पाच लाख रुपये देऊन विषय संपवा असे सांगितले.’दरम्यान, या प्रकाराने घाबरलेल्या फिर्यादीने घरी जात कुटुंबीयांशी विचारविनिमय करत त्यांच्या विरोधात फौजदारी अतिक्रमण केल्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची फिर्याद दिली आहे.

Previous articleशेवाळवाडी येथील कळंबा देवीच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली
Next articleभजी न केल्याने वडिलांनी केली मुलीला गंभीर मारहाण