नारायणगाव येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे बाप लेकाच्या मृत्यू प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व वायरमन यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

वायरमन योगानंद वाडेकर, महावितरण कंपनीचे बोरी येथील शाखा अभियंता सतिश मोरे, नारायणगाव येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सिध्दार्थ सोनवणे अशी गुन्हा दाखल केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद भास्कर यादव पटाडे वय ४२ वर्षे राहणार पटाडे मळा बोरी खुर्द( साळवाडी) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यादव भिमाजी पटाडे (वय ७० वर्षे)
श्रीकांत यादव पटाडे (वय ३७ वर्षे रा.पटाडेमळा,बोरी खुर्द(साळवाडी) ता.जुन्नर जि.पुणे) व महादेव काळे यांचा पाळीव कुत्रा २५ जुलै रोजी १२.३० वा चे सुमारास (मौजे बोरी खुर्द (साळवाडी) ता.जुन्नर जि.पुणे) गावच्या हद्दीत
पटाडे मळा येथील शेत जमीन गट नंबर ६०४ मधील उसाच्या शेतात औषध फवारणीसाठी गेले असता त्यांना मोकळ्या अवस्थेत पडलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. या मोकळ्या अवस्थेत असणाऱ्या ताराबाबत उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय नारायणगाव यांना वेळोवेळी शेतातील तारा तुटल्याने काढून घेणेबाबत तोंडी व ग्रामपंचायत बोरी खुर्द यांनी लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी उपाययोजना केली नाही. या तारांना कोणाचाही स्पर्श होऊन त्यामध्ये एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो हे त्यांना माहीत असताना देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यामुळे योगानंद वाडेकर ,सतीश मोरे, सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर फिर्यादीचे वडील व लहान भाऊ तसेच महादेव काळे यांचा पाळीव कुत्रा यांच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक एस जी धनवे करीत आहेत.

Previous articleउपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
Next articleराजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्द्यांचा गौरव