सह्याद्रीच्या खोऱ्यात लोकमान्य टिळकांना मानवंदना ; रॅपलिंगचा थरार अनुभवत फडकाविला तिरंगा

राजगुरूनगर- गुरु पौर्णिमा आणि लोकमान्य टिळक जयंतीचे औचित्य साधतं टिम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्स यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री खोऱ्याला साजेसा रांगडेपणा आणि राकटपणा असल्याने साहसी गिर्यारोहकांचे आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या शितकडा धबधब्यावरील तब्बल ३५० फुटांच्या रॅपलिंगचा थरार राजगुरूनगरच्या गिर्यारोहकांनी सुरक्षितपणे अनुभवत अभिमानाने तिरंगा फडकावित गुरुंना नमन करीत आणि लोकमान्य टिळकांना मानवंदना देत, “भारत माताकी जय”, “वंदे मातरम” या घोषणा देत केलेली ही धाडसी मोहीम कोविड योद्ध्यांना समर्पित केली.

या मोहिमेची सुरवात उंभ्रांडे ( ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक ) येथून झाली. अर्ध्या तासाच्या पायपिट करून नदी पात्र ओलांडून शितकडा धबधबा येतो आणि सुरु होतो या मोहिमेचा खरा थरार. पहिला १० फूटी खडकाळ टप्पा उतार झाल्यावर आणि कड्यावर आल्यावर दिसते ते शितकडा धबधब्याचे मनात धडकी भरवणारे रूप.

रॅपलिंगच्या चित्तथरारक अनुभूती साठी या ठिकाणी आल्यावर शरीरावर नियंत्रण रहावे म्हणून दोन्ही पायात सुरक्षित अंतर ठेवून कड्यावर चेहरा खडकाच्या दिशेने आणि पाठ दरीच्या दिशेने करून शरीरावर दोरीच्या सहाय्याने नियंत्रण ठेऊन दरीच्या दिशेने झुकावे लागते. हा क्षण म्हणजे काळजाचे ठोके चूकवणारा आहे.

खडकावर पाय रोवून शरीर मागे दरीच्या दिशेने झोकुन हा पहिला १०० फूटी टप्पा पार करताना हातातील दोरी वरती ओढून शरीर खाली घ्यावे लागते. त्यानंतर मात्र आपण केवळ दोरीच्या सहाय्याने हवेतच असतो. हा टप्पा पायांचा वापर न करता केवळ हातातील दोरी शितफिने वरती ओढून शरीर खाली घ्यावे लागते. शेवटचा ८० फूटी टप्पा हा धबधब्याच्या पाण्यातून गेल्याने ओलेचिंब भिजून हा चित्तथरारक रॅपलिंगचा अनुभूती देणारा ठरतो. टिमच्या मदतीने खाली आल्यावर खोल साठलेल्या पाण्यात न जाता दाव्या बाजूला सुरक्षितपणे आपण जातो.

तब्बल ३५० फुटांचे चित्तथरारक रॅपलिंग, धुक्यात हरवलेला परिसर, मुसळधार पाउस, ओले कातळकडे, निसरडी पाऊलवाट, शेवाळलेले खडक, हुडहुडी भरवणारी थंडी, नदी पात्रात होणारी वाढ पण तरीही कधी दोरीच्या साह्याने तर कधी काठीच्या साह्याने एकमेकांना आधार देत सुरक्षितपणे नदीपात्र ओलांडणे अशी अनेक आव्हाने या मोहीमेत होती.

अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात डॉ.समीर भिसे, ओंकार रौंधळ, शिवाजी जाधव, अथर्व शेटे आणि वीर सह्याद्री ट्रेकर्सचे संदीप येळवंडे, कालिदास गाडे, राहुल भालेकर, अनिल गाडे, गणेश मोरे, माऊली गाडे, सागर काळडोके, अजित बोत्रे या गिर्यारोहकांनी टिम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्स च्या चेतन शिंदे, जाॅकी साळुंखे, चेतन बेंडकोळी, अमोल तेलंग, सौरव भगत, रूपा मराठे-साळुंखे या गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे मोहीम फत्ते करीत लोकमान्य टिळकांना वंदन करीत अभिमानाने तिरंगा फडकावित, केलेली ही धाडसी मोहीम कोविड योद्ध्यांना समर्पित केली.

Previous articleमुबंई माता बाल संगोपन संस्थेच्या माध्यमातून आदिवासी शाळांना डिजिटल टॅबचे वितरण
Next articleवेगरे गावचा रस्ता वाहून गेल्याने गावचा संपर्क तुटला,अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान