वेगरे गावचा रस्ता वाहून गेल्याने गावचा संपर्क तुटला,अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान

गावाची पाहणी करून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी माजी सरपंच भाऊ मरगळे यांनी केली आहे

पौंड- वेगरे (ता.मुळशी) ता.22 मुळशी तालुक्यात सर्वत्र बुधवारी रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य जोरदार मुसळधार पावसामुळे वेगरे ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी असणारा लाव्हार्डे ते वेगरे या रस्त्यावरील काही ठिकाणच्या मोऱ्या वाहून गेल्यामुळे व अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दगड-माती झाडे वाहून आले आहेत त्यामुळे येथील ग्रामस्थांचे दळणवळण बंद झाले असून गावचा संपर्क तुटला आहे.

त्यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान झाले आहे, तर येथील ग्रामस्थांच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे भात शेतीचे बांध फुटले असून वावरामध्ये माती भराव वाहून आले आहेत, तर येथील पशुपालक पांडुरंग मरगळे यांचा बोकड ओढ्याने वाहून गेला व अंकुश कानगुडे ,गोपाळ गुजर ,कोंडीबा मरगळे व महादेव कोकरे यांनी नुकतीच भातलावणी केली होती परंतु त्यांच्या शेतात ओढ्याचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणावर भातशेतीचे नुकसान झाले आहे.

गावातील वीज ही बंद आहे, स्थानिक पातळीवर आवश्यक ते मदत कार्य ग्रामस्थ करत असून शासनाच्या संबंधित विभागाला सदर परिस्थितीची माहिती कळवली असून या भागाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी वेगरेचे माजी सरपंच भाऊसाहेब मरगळे यांनी केली आहे. याबाबत वेगरे गावच्या तलाठी मनिषा पवार यांनी वैद्यकीय रजेवर असताना देखील तत्परता दाखवत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला असून सदर माहिती वरिष्ठ कार्यालयात कळवली आहे.

तसेच ग्रामसेवक संजय चव्हाण व सरपंच मिंनाथ कानगुडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याची पाहणी केली आहे तर स्थानिक पातळीवरच्या मदत कार्यात महादेव कोकरे, सदाशिव गुजर, रामभाऊ मरगळे, सूर्यकांत कानगुडे, गणपत गुंड, रवींद्र गुंड, यशवंत कोळी,बाबू मरगळे, जणू मरगळे ,विठ्ठल मरगळे, सुनील कात्रट, कोंडीबा बावधने, रामभाऊ कोकरे हे अग्रेसर आहेत.

Previous articleसह्याद्रीच्या खोऱ्यात लोकमान्य टिळकांना मानवंदना ; रॅपलिंगचा थरार अनुभवत फडकाविला तिरंगा
Next articleपर्यटनस्थळी पर्यटकांसाठी तारांकित दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार – दिपक हरणे