पुणे-नाशिक रेल्वेचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

अमोल भोसले

भूसंपादनाला विरोध असतानाही कंत्राटदाराने उभ्या शेतात काम सुरू करून पिकांची नासाडी केल्याने कोलवडी, मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील चिडलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत काम बंद पाडले. पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी येथे भूसंपादन व भूगर्भ तपासणीचे काम सुरू केले होते.

येथील कोलवडी व मांजरी खुर्द अशा दोन्हीही गावच्या अनेक शेतकऱ्यांनी या रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी विरोध केला आहे. त्याबाबतचे निवेदनही उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. असे असतानाही अधिकारी व कंत्राटदार मनमानी व बळजबरी करीत आहेत. शेतातील पिकांची नासाडी करून आम्हाला त्रास देत असल्याची तक्रारशेतकरी विकास कांचन, अजित मदने, शेखर साळुंखे, सुनिल रवळेकर, महेश माने, आबा गायकवाड आदी शेतकऱ्यांनी केली आहे. अधिकारी व कंत्राटदाराचा यावेळी शेतकऱ्यांनी निषेध केला.

दरम्यान, या शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांना पुण्यातील विधानभवन येथे निवेदन देवून अन्याय होत असल्याची तक्रार केली. उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार खासदार कोल्हे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा झाल्याशिवाय येथे कोणत्याही प्रकारचे काम करू नये, अशी सूचना उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे यांना दिली आहे.

प्रकल्पातील रेल्वे अधिकारी शेखर भोसले म्हणाले, “मांजरी खुर्द, कोलवडी परिसरात काम सुरू केले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तुर्तास ते थांबविण्यात आले आहे. भूसंपादनाबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आल्यानंतर काम सुरू केले जाईल.’

Previous articleजुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या खूनाचा उलगडा
Next articleहडपसर येथे पालखी सोहळ्याचे प्रतिकात्मक स्वागत