हडपसर येथे पालखी सोहळ्याचे प्रतिकात्मक स्वागत

अमोल भोसले

रूप पाहता लोचनी,
सुख झाले हो साजणी ।।
तो हा विठ्ठल बरवा,
तो हा माधव बरवा ।।

असा विठ्ठल नामाचा जयघोष, टाळमृदंगाचा नाद, त्या तालावर पावलांनी धरलेला ठेका, फुगड्यांच्या गिरक्या आणि मनमोहक सजावट अशा भक्तीमय वातावरणात आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे प्रतिकात्मक स्वागत करण्यात आले. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख अँड. विकास ढगे यांच्या हस्ते दोन्हीही संतांच्या पालखी विसावा स्थळावर ग्रंथपूजा व आरती करून पालखीला निरोप देण्यात आला.

पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, नगरसेवक मारुती तुपे, वैशाली बनकर, उज्ज्वला जंगले, योगेश ससाणे, माजी नगरसेवक व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देशमुख, निलेश मगर, हडपसर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, पालिकेच्या स्विकृत सदस्या संजीवनी जाधव, अविनाश काळे, पल्लवी सुरसे, प्रशांत सुरसे, इशान तुपे, नंदकुमार रणवरे, ज्ञानेश काळे, चंद्रकांत झेंडे, गोपीनाथ पवार, योगेश गोंधळे, बच्चूसिंग टाक, सागर भोसले, प्रमोद रणवरे, बाळासाहेब केमकर, शौकत शेख, विश्वास तुपे, हर्षवर्धन हरपळे, राजू महाडिक, कमलेश कासट आदी यावेळी उपस्थित होते.

आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज तर श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले आहे. पायी वारीच्या परंपरेनुसार दोन्हीही पालख्या हडपसर येथे विसावा घेऊन पुढे मार्गस्थ होत असतात. या पालख्यांचे स्थानिक भाविकांनी टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठल-रुक्माई माऊली-तुकाराम असा जयघोष करीत प्रतिकात्मक स्वागत केले.

गाडीतळ येथे सासवड रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज तर सोलापूर रस्त्यावरील संत तुकाराम महाराज पालखी विसाव्यावर स्थानिक भाविकांनी फुलांची आकर्षक सजावट केली होती. सडा रांगोळी व धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करण्यात आले होते. भजनी मंडळाने विविध प्रकारचे अभंग गायन केले. याच तालावर उपस्थित महिला व पुरूषांनी फुगडी घातली. फेर धरून वातावरण अधिकच भक्तीमय केले. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनीही गळ्यात टाळ घेऊन वारीचा आनंद अनुभवला.

“पायी वारी करायला मिळत नाही; ही खंत वारकरी भाविकांमध्ये असणे स्वाभाविक आहे. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेता सरकारच्या नियमानुसार सोहळा करावा लागत आहे. यामध्ये भक्तीभाव कोठेही कमी झालेला नाही. घरी राहूनही आपण संत वचनांप्रमाणे सर्वजण पांडुरंगाच्या चरणी भाव अर्पण करु शकतो. वारकऱ्यांनी याबाबत दाखवलेले सामंजस्य महत्वपूर्ण आहे’
अँड. विकास ढगे
पालखी सोहळा प्रमुख

“वारकरी संप्रदाय प्रगल्भ व समन्वयशील आहे. त्यामुळे गेली दोन वर्षापासून तो प्रतिकात्मक वारीने यामध्ये सहभागी होत आहे. प्रेमाने आणि शुध्द मनाने तो या सोहळ्यात घरी राहूनच परमेश्वराचे नामस्मरण करीत आहे. एका वेगळ्या भक्तीचे दर्शन त्याने जगाला दाखवून दिले आहे.’
अभय टिळक
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त

Previous articleपुणे-नाशिक रेल्वेचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद
Next articleवारीच्या वाटेवरील गावांची निराशा