जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या खूनाचा उलगडा

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शोधण्यास आज नारायणगाव येथे यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी मारहाण झालेला जखमी फिर्यादी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्युमुखी पडल्याने या घटनेतील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपींना नारायणगाव (ता. जुन्नर) येथे पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश मिळाले आहे.

याबाबत माहिती अशी की, घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक २७ जून २०२१ रोजी भा.द.वि. कलम ३२६ नुसार जखमी फिर्यादी कैलास उर्फ बाबू दशरथ गेंगजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंद विठ्ठल मधे व त्याच्या साथीदारांवर घोडेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान रुग्णालयात फिर्यादी कैलास उर्फ बाबू गेंगजे हा उपचार घेत असताना काही दिवसांपूर्वी मृत्यूमुखी पडला. यामुळे या घटनेतील आरोपींवर भा.द.वि. कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला. त्यानुसार आज दिनांक ६ जुलै रोजी आरोपी गोविंद विठ्ठल मधे हा नारायणगाव येथे टोमॅटो मार्केट मध्ये येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे पोलिसांना समजली होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये सापळा लावून तयार होते.

या सापळ्यामध्ये आरोपी पकडला गेला. त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव गोविंद विठ्ठल मधे (वय २९ रा. गंगापूर बु. ता.आंबेगाव, जि.पुणे) असे सांगितले. तसेच त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून कैलास गेंगजे याला कोयता तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याची कबुली दिली.

दरम्यान या आरोपीला घोडेगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, हनुमंत पासलकर, पोलीस नाईक दिपक साबळे, पोलीस शिपाई संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, मुकुंद कदम, दगडू विरकर, प्रसाद पिंगळे यांनी ही कामगिरी केली.

Previous articleग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी
Next articleपुणे-नाशिक रेल्वेचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद