सुधागडवर डॉक्टरांना आणि त्यांच्या कार्याला सलाम करीत तिरंगा फडकाविला

राजगुरूनगर-राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून शिवदुर्ग साम्राज्य प्रतिष्ठान आणि भटकंती गड दुर्गांची यांच्या वतीने श्री शिवछत्रपतींचे पदस्पर्श झालेला आणि स्वराज्याची राजधानी म्हणून विचार झालेला किल्ले सुधागड सर करीत गडावरील गोमुखी बांधणीच्या महादरवाजा समोर करोना महामारीत रुग्णांच्या संपर्कात राहून आपल्या जीवाची बाजी लावत प्रामाणिकपणाने अविरत देशसेवा करित रुग्णांना केवळ उपचारातून बरे न करता मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभे करीत दिशा देणाऱ्या डॉक्टरांना आणि त्यांच्या कार्याला सलाम करीत तिरंगा फडकाविला आणि केलेली ही २१ किमी ची भटकंती मोहीम कोविड योद्ध्यांना समर्पित केली.

या मोहिमेची सुरवात ही ठाकूरवाडी (ता. सुधागड, जि.रायगड) येथून झाली. सुरवातीचा खड्या चढाईचा टप्पा पार केल्यावर दोन शिड्या लागतात. शिडी चढून गेल्यावर थोड्या वेळात प्रशस्त पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला चिलखती बुरुज आहे. बाहेरच्या तटबंदीत जाता यावे म्हणून एक छोटासा जिना आहे. येथून पुढे गेल्यावर अर्ध्या तासात गडाचे अतिशय प्रशस्त पठार आहे.

पठाराच्या डावीकडे कमळ तळे आणि महादेवाचे मंदिर आहे. अजून पुढे दावी कडे सिद्धेश्वर मंदिराच्या पुढे भांड्यांचे टाके, धान्य कोठार, तळे आहे. पुढे गेल्यानंतर भव्य असा पंतसचिव वाडा आहे. वाड्याच्या उजव्या बाजूलाच भोरेश्वराचे मंदिर आहे तर डाव्या बाजूला चोर दिंडी तटबंदी आहे. या चोर दिंडी तटबंदीहुन ओंबळे बुरुज दिसतो. या पंतसचिव वाड्या पासून थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूची पायवाट ही तलाव आणि धान्य कोठारांचे अवशेष असलेल्या ठिकाणाहुन पुढे टकमक टोकाकडे घेऊन जाते. येथील नजारा हा काळजाचे ठोके चुकवणारा आहे.

पंतसचिव वाड्या पासून सरळ सरळ वाट ही भोराईदेवी मंदिरात जाते. या मंदिराच्या बाहेरच हत्तीमाळ‌\हत्तीस्तंभ आणि अनेक वीरघळ आहेत. समोरच अनेक अज्ञात वीरांच्या समाधी आहेत. येथून समोरच असणाऱ्या हनुमान मंदिराच्या पुढे जाऊन धोंडसे गावातून वर येणाऱ्या पायवाटेने थोडेसे गडउतार झाल्यावर येतो एतेहासिक महादरवाजा.

सुधागडावरील महादरवाजा हा रायगडावरील महादरवाजाची हुबेहूब प्रतिकृती आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. अश्या या एतेहासिक महादरवाजा समोर गिर्यारोहकांनी करोना महामारीत रुग्णांच्या संपर्कात राहून अविरत सेवा देत केवळ उपचारातून बरे न करता मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभे करीत दिशा देणाऱ्या डॉक्टरांना आणि त्यांच्या कार्याला सलाम करीत तिरंगा फडकाविला आणि केलेली ही मोहीम कोविड योद्ध्यांना समर्पित केली.

या मोहिमेत डॉ.समीर भिसे, ओंकार रौंधळ, रविंद्र गाढवे, बाबाजी शेटे, तानाजी राजगुडे, संतोष सोनवणे, वैष्णवी गाढवे (वय १३ वर्षे), श्रेयश सोनवणे(वय ११ वर्षे), अमोल धोंडगे आणि सागर कदम हे गिर्यारोहक सहभागी झाले होते.

Previous articleटेकवडी येथे रोजगार हमी योजने अंतर्गत शोषखड्डे आणि वृक्ष संवर्धन उपक्रमाची लोकसहभागातून सुरुवात
Next articleरिंगरोड विरोधी कृती समितीच्या वतीने उपोषण : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांची रिंग रोड रद्द करण्याची मागणी