Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नारायणगाव (किरण वाजगे)
नगर व पुणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागात दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या घातल्या. या कारवाईत अट्टल गुन्हेगार सिद्धार्थ रमेश बर्डे (वय २१ रा. खोडद, तालुका जुन्नर) या आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्याकडून चार लाख दहा हजार रुपयांच्या अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, बेल्हे, आळेफाटा आदी ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना सातत्याने वाढल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सातत्याने होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लवकर व्हावा व आरोपींना अटक करण्यात यावे अशा सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या होत्या.
या अनुषंगाने पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान खोडद परिसरातील काही तरुण कोणत्याही प्रकारचा कामधंदा न करता वारंवार वेगवेगळ्या मोटरसायकली वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
रविवार दिनांक १३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताफ्यातील पोलीस कर्मचारी नेताजी गंधारे, दिपक साबळे, संदीप वारे, विक्रम तापकीर, सचिन गायकवाड, अक्षय नवले, निलेश सुपेकर, मुकुंद कदम यांनी पाठलाग करून एका तरुणास अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता आरोपींनी पारनेर, रांजणगाव, नारायणगाव, आळेफाटा येथे दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या आरोपींकडून चार लाख दहा हजार रुपये किमतीच्या अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुढील तपासासाठी या आरोपींना नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केल्याबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.