पूर्व हवेली तालुक्यातून रिंगरोड, बुलेट ट्रेन जात असल्याने शेतकरी भूमिहीन होणार – राजेंद्र चौधरी

अमोल भोसले,उरुळी कांचन

मुंबई – पुणे – हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हवेली तालुक्याच्या पुर्व भागातील बागायती जमीनीमधून जात असून शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र सरकार करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केला आहे.

या संदर्भात राजेंद्र चौधरी यांनी एक निवेदन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना दिले आहे. या निवेदनात त्यांनी वरील मत व्यक्त केले आहे. या संदर्भात बोलताना राजेंद्र चौधरी पुढे म्हणाले मुंबई – पुणे – हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचा नकाशा नुकताच प्राप्त झाला आहे. हि बुलेट ट्रेन हवेली तालुक्याच्या पुर्व भागातील बागायती गावांमधून जात आहे. त्यामुळे शेतक-यांच्या बागायती जमिनी केंद्र शासन ताब्यात घेणार आहे. शेतक-यांच्या बागायती जमिनी ताब्यात घेतल्यास शेतकरी देशोधडीला लागून शेतक-यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय रहाणार नाही. त्यामुळे या भागातून मुंबई – पुणे – हैदराबाद बुलेट ट्रेन नेऊ नये अशी आमची आग्रही मागणी आहे. या संदर्भात खासदार डॉ अमोल कोल्हे यांना एक निवेदन दिले आहे. शेतक-यांच्या बागायती जमिनी या बुलेट ट्रेनच्या मार्गातून वाचवण्याचे आश्वासन अमोल कोल्हे यांनी दिले आहे. केंद्र सरकारने शेतक-यांच्या विरोधाला न जुमानता काम करण्याचा प्रयत्न केल्यास पूर्व हवेलीतील शेतकरी एकत्र येऊन प्रखर विरोध करतील असा इशारा राजेंद्र चौधरी यांनी दिला आहे.

मुंबई – पुणे – हैदराबाद हा ७११ किलोमीटरचा हायस्पीड बुलेट ट्रेनचा प्रस्ताव शासन दरबारी विचाराधिन आहे. या बुलेट ट्रेन मुळे मुंबई, लोणावळा, पुणे, कुरकुंभ, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, जाहिराबाद, हैदराबाद हि शहरे जोडली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी शासनाने निविदा मागवल्या आहेत. नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड तर्फे या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. हे सर्वेक्षण पूर्ण करुन प्रवासी संख्या आदी सर्व माहिती संकलित करून सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे.

Previous articleअट्टल दुचाकी चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेडया
Next articleगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सूधीर वाळुंज यांचे केले अभिनंदन