अट्टल दुचाकी चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेडया

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुणे आणि नगर जिल्ह्यात मोटार सायकलांची चोरी करून धुमाकुल घातलेल्या एका अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खोडद (ता. जुन्नर) येथून रविवारी(ता. १३) अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे ४ लाख दहा हजार रुपये किमतीच्या ११ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सिद्धार्थ रमेश बर्डे (वय-२१, रा. खोडद, ता. जुन्नर,) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीस पकडण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, सचिन गायकवाड, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर आणि मुकुंद कदम यांचे पथक तयार करण्यात आले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदर मोटारसायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

त्यानुसार सदर पथकाने गुन्ह्याचा तपास करीत असताना जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. सदर पथकातील पोलिसांनी एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, खोडद (ता. जुन्नर) या गावात काही इसम कामधंदा न करता वारंवार विविध प्रकारच्या मोटारसायकल वापरत आहेत. पोलिसांनी रविवारी (ता. १३) सदर ठिकाणी गेले असता, आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्यातील एकाने त्याचे सिद्धार्थ रमेश बर्डे असे नाव सांगितले. तसेच त्यांने ११ मोटार सायकलांची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. असा त्याच्याकडून सुमारे ४ लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीसोबत एक विधिसंघर्षग्रस्त बालक असे मिळून आले आहे.

दरम्यान, सिद्धार्थ बर्डे या आरोपीने पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यात मोटारसायकल चोरी केलेल्या ८ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याची वैदकीय तपासणी करून पुढील कारवाई साठी नारायणगाव ठाण्याच्या ताब्यात वर्ग करण्यात आले आहे.

Previous articleआदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बकोरीच्या डोंगरावर वृक्षारोपण
Next articleपूर्व हवेली तालुक्यातून रिंगरोड, बुलेट ट्रेन जात असल्याने शेतकरी भूमिहीन होणार – राजेंद्र चौधरी