मुळशीत ई पीक पाहणीला प्रारंभ

मुळशी – ई पीक नोंदणी ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना असून इ पीक पाहणी ॲपमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने माहिती भरता येत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत फायद्याचा आहे अशी माहिती वेगरे चे माजी आदर्श सरपंच व म्हसवेश्वर सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब मरगळे यांनी दिली .

वेगरे (ता.मुळशी) येथे महसूल व कृषी विभागाने सुरू केलेल्या ई पीक पाहणी चा प्रारंभ मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के,तलाठी मनिषा पवार ,कृषी सहाय्यीका
पल्लवी पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन वेगरे चे माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

वेगरे येथील शेतकरी सूर्यकांत नथू कानगुडे यांच्या शेतात प्रात्यक्षिक दाखवून ई पीक पाहणी व नोंदणी पूर्ण करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक संजय चव्हाण ,पोलीस पाटील यमुना मरगळे ,तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण कानगुडे, संगणक ऑपरेटर अनिकेत भोसले ,राजेंद्र गुंड ,शत्रुघ्न कानगुडे, रवींद्र गुंड, नथू कानगुडे ,एकनाथ दोन्हे ,राहुल गोविलकर, संतोष आखाडे, सुनील कात्रट, रामभाऊ कोकरे ,महादेव कोकरे ,मलिक कोकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी भाऊसाहेब मरगळे म्हणाले माझी शेती माझा सातबारा मीच करणार माझा पिकपेरा या उद्देशाने सुरू केलेल्या या उपक्रमात शेतकरी मोबाईल द्वारे आपल्या शेतातील पिकांची व बांधावरील झाडांसह इतर फळझाडांची, गवत पड आदींच्या माहितीसह विहीर, बोअरवेल या पाणी सिंचन साधनांची माहिती भरू शकणार आहेत ,याबाबत सर्व शेतकर्‍यांना पुढील प्रमाणे माहिती भरता येणार असून त्यासाठी जास्तीत जास्त सुशिक्षित युवकांनी यामध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले, तसेच नोंदणी पूर्ण झाल्यानंतर गाव पातळीवरील पेरणी अहवालाची खरीखुरी व वास्तववादी माहिती शासनात उपलब्ध होईल ही माहिती संकलन करताना पारदर्शकता आणण्यासाठी अहवाल नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे, योग्य आणि अचूक इ पीक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रशासनास कृषी पतपुरवठा सुलभ करणे/होणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शासनास अचूक भरपाई व योग्य प्रकारे मदत करणे सोपे होणार आहे.

ई पिक नोंदणी करताना काही अडचणी आल्यास संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी ,कृषी सहाय्यक माझ्याशी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.

“ ई पीक पाहणी ” मोबाईल ॲपमधे शेतकर्यांनी नोंदणी कशी करावी,याबाबत सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या.
• नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोर /वेब लिंक वरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (install) करावा.
• खातेदाराने ॲप मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी.
• ७/१२ मधील नावाप्रमाणे खातेदाराने त्यांच्या नावाची अचूक पणे नोंदणी करावी.
• खातेदार त्यांचे पहिले, मधले, आडनाव, खाते क्रमांक व गट क्रमांक शोधून नोंदणी करू शकतील.
• ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एका पेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत, त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास, त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन/गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील.
• वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस(SMS) द्वारे चार अंकी संकेतांक (पासवर्ड) प्राप्त होईल.
• सदरहू प्राप्त झालेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) चौकटीत अचूकपणे नोंदविल्यास खातेदाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
• यशस्वी नोंदणी प्रक्रियेनंतर नोंदणीकृत मोबाईलवर खातेदाराचे नाव निवडून चार अंकी संकेतांक (पासवर्ड) चौकटीत टाकून लॉगिन केल्यास पिक पाहणीची माहिती भरता येईल.
शेतकऱ्या साठी “ ई पीक पाहणी “ संदर्भात सर्व साधारण मार्गदर्शक सूचना

• शेतकऱ्यांच्या नोंदणीकरिता त्यांचा खाते क्रमांक/भूमापन/गट क्रमांकाच्या माहितीसाठी संगणकीकृत ७/१२ किंवा ८अ ची अद्ययावत प्रत सोबत असल्यास योग्य राहील.
• सामायिक मालकीच्या जमिनीसाठी, ज्याचे नाव गाव न.नं.७/१२ मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे, ते स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
• अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक (अज्ञान पालक कर्ता) नोंदणी करू शकतील.
• मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल त्या ठिकाणी जावून नोंदणी करता येईल.
• नोंदणीकृत मोबाईलवर आलेला चार अंकी सांकेतांक (पासवर्ड) कायमस्वरूपी वैध राहून वापरता येईल.
• एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल, तर सहजरीत्या उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन नोंदणीसाठी वापरू शकतात.
• एका मोबाईल नंबरवरून एकूण २० खातेदारांची नोंदणी करता येईल.
• सुधारीत सात बारा नमुना मध्ये बिनशेती जमीनीची पीक पाहणी करणेची आवश्यकता असणार नाही. त्यामुळे अशी बिनशेती ची स नं ई पीक महाराष्ट्र ॲप मध्ये उपलब्ध होणार नाहीत.
“ई पीक पाहणी” मोबाईल ॲपच्या साहायाने बांधावरील झाडे कशी नोंदवावी?

बांधावरील झाडे आपण आपल्या सातबाऱ्यावर नोंदविण्याची पद्धत समजावून घेवूयात.
• ई पीक पाहणी ॲपच्या डॅशबोर्डवर असलेल्या बांधावरील झाडे या बटनवर क्लिक करा.
• तुमचाखाते क्रमांक निवडा.
• तुमच्या शेताचा गट क्रमांक निवडा.
• तुमच्या शेताच्या बांधावर असलेल्या झाडांची निवड करा.
• झाडाची संख्या दिलेल्या चौकटीत टाका.
• बांधावरील झाडाचे छायाचित्र कॅमेरा आयकॉनच्या सहाय्याने घ्या व अपलोड करा.
• छायाचित्र काढल्यावर शेवटी सबमिट करा या बटनवर क्लिक करा.
व आपली नोंदणी पूर्ण झाल्याची खात्री करून घ्या.

Previous articleआखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा.सुरेश वाळेकर यांची निवड
Next articleभाजपाच्या किसान मोर्च्याच्या तालुकाध्यक्षपदी रतन मांडेकर यांची निवड