सरकारवर अवलंबून न राहता दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदतीचा दिलासा देण्यासाठी तालुका पत्रकार संघांनी पुढाकार घ्यावा – एस.एम.देशमुख

गणेश सातव,वाघोली

राज्यात कोरोनाने १३५ पत्रकारांचे बळी गेले असले तरी दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबासाठी सरकार काहीच करीत नाही.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेली ५० लाख रूपयांची घोषणा केव्हाच इतिहास जमा झाली आहे.मात्र सरकार काही करीत नाही म्हणून रडत बसणे मराठी पत्रकार परिषदेला मान्य नाही. जे परिषदे बरोबर आहेत अशा दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पत्रकारांचे हजारो हात पुढे येत आहेत ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. यापुढे राज्यातील एकही पत्रकार एकाकी नाही किंवा निराधार नसेल. “हम है ना” ची मोहिम आता हळूहळू राज्यात सर्वत्र सुरू होत आहे.त्याचे स्वागत केले पाहिजे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील पत्रकार नंदकुमार पांचाळ यांचं काही दिवसांपूर्वी कोरोनानं निधन झाले.चणई सारख्या छोट्या गावात राहून पत्रकार म्हणून पांचाळ यांनी उल्लेखनीय काम केलं.मात्र त्यांच्या आकस्मिक निधनानं सैरभैर झालेल्या पांचाळ कुटुंबियांना थोडा आधार देण्याचं काम मराठी पत्रकार परिषद,शाखा अंबाजोगाईने केले आहे. सर्व पत्रकारांनी आपल्या ऐपतीनुसार निधी दिला आणि जमा झालेले ५१ हजार रूपयांचा निधी पांचाळ कुटुंबाकडे सुपूर्द केला. डॉ. राजेश इंगोले आणि चणई गावचे सरपंच अनिल शिंदे यांच्या हस्ते हा निधी देण्यात आला. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष दत्ता अंबेकर आणि अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष गजानन मुडेगावकर यांनी याकामी पुढाकार घेतला.या उपक्रमामुळे मराठी पत्रकार परिषदेची प्रतिष्ठा अधिक वाढली आहे.

दुसरी सकारात्मक बातमी आहे राहुरीची.खुडसरगाव येथे वास्तव्य करून असलेले पत्रकार कैलाश देढे यांचाही कोरोनानं बळी घेतला.राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र आले. त्यांनीही निधी जमा केला आणि जवळपास ६८ हजार रूपयांचा निधी देढे कुटुंबियांकडे सुपूर्द केला. हा निधी तुटपुंजा जरी असला तरी ‘आम्ही एकटे नाही आहोत,आपले पत्रकार बांधव आपल्या सोबत आहेत हा विश्वास पत्रकारांच्या मनात निर्माण करण्यासाठी हा निधी पुरेसा आहे.दोन्हीही पत्रकार संघाचे या उपक्रमानिमित्ताने राज्यातील पत्रकार बांधवाच्यावतीने अभिनंदन होत आहे.

ज्या तालुक्यात अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत तेथील दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना अशाच स्वरुपाची मदत करण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुका संघांनी पुढाकार घ्यावा असे विनंतीपूर्वक आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे.

Previous articleतीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा अट्टल गुन्हेगार शुभम कामठे अखेर लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात
Next articleवृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या सदस्यांचा जिल्हा परिषदच्या वतीने विशेष सन्मान