तीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा अट्टल गुन्हेगार शुभम कामठे अखेर लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात

अमोल भोसले,पुणे

मोक्क्यांतर्गत फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी सोरतापवाडी (ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या हद्दीतून रविवारी (ता. २३) अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

शुभम कैलास कामठे (वय २६ , रा.मराठी शाळेचे मागे, कदमवाकवस्ती, ता. हवेली)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कामठे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहन इंगळे या व्यक्तीला कोयत्याने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या परिसरात दहशीतेचे वातावरण निर्माण केले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला त्वरित पकडण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता यांनी सर्व पोलिसांना सूचना दिल्या होत्या.

सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम कामठे हा सोरतापवाडी येथे येणार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अमित साळुंखे आणि निखील पवार यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या अनुशंघाने आरोपीला पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, नितीन गायकवाड, रोहीदास पारखे, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, राजेश दराडे, दिगंबर साळुंके, बाजीराव वीर, निखील पवार आणि शैलेश कुदळे यांचे पथक तयार करण्यात आले.

सदर पथकाने आरोपी शुभम कामठे पकडण्यासाठी सोरतापवाडी येथे सापळा रचला होता. आरोपी गोल्डन ड्रिम्स लॉजच्या समोर येताच त्याला पोलीसांची चाहुल लागली. आरोपीने पोलीसांना चकवा देवून तेथुन पळ काढला. परंतु, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला मोठ्या शिताफीने पकडले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, आरोपी शुभम कामठे याने लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण केली होती. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि मारामारी यासारखे गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. तो मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. लोणी काळभोर पोलिसांनी सोरतापवाडी येथे रचलेल्या जाळ्यात अलगद तो अडकला.

Previous articleडॉ.अमोल पाटील यांची ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी निवड
Next articleसरकारवर अवलंबून न राहता दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदतीचा दिलासा देण्यासाठी तालुका पत्रकार संघांनी पुढाकार घ्यावा – एस.एम.देशमुख