पोलिस असल्याचा बनाव करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

नारायणगाव (किरण वाजगे)

सीबीआय पोलीस असल्याचा बनाव करून एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील दोन अंगठ्या लुटल्याची घटना नारायणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. याबाबत पीडित ज्येष्ठ नागरिक अशोक सदाशिव जंगम (वय ७२ वर्ष, राहणार राम चौक नारायणगाव) यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की, ज्येष्ठ नागरिक अशोक जंगम हे ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वारूळवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रासमोरील गिरिजा हॉटेल जवळील चिक्कूच्या बागेजवळ उभे असताना दोन अज्ञात लुटारूंनी जंगम यांना बोलण्यात गुंतवले. आम्ही सीबीआयचे पोलीस असून तुकाराम शिंदे कोठे राहतो असे विचारून तो गांजा विक्री करत आहे. असे जंगम यांना सांगितले. सध्या कोरोना चालू असून तुम्ही हातात अंगठी व गळ्यात सोन्याची चेन घालू नका. असे सांगून जंगम यांच्या हातातल्या प्रत्येकी एक तोळा वजनाच्या दोन अंगठ्या व गळ्यातील दोन तोळे सोन्याची सोन्याची चेन काढून रुमालात ठेवा असे त्या दोघांनी सांगितले. अशाप्रकारे गोड बोलून जंगम यांना त्या अज्ञात लुटारूंनी भुरळ घालून सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एस आय नवघरे या करीत आहेत.

Previous articleरेटवडीत १०५ जणांचे मोफत कोव्हिड लसीकरण
Next articleपर्यटकांसाठी पॅराग्लाइडिंग एक आनंददायक साहसी खेळ:एका साहसवेड्या तरुणाची संघर्षमय कहाणी