घोडेगाव पोलिसांची मटक्याच्या अड्ड्यावर व दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई

प्रमोद दांगट, प्रतिनिधी

घोडेगाव ( ता . आंबेगाव ) येथे मटका जुगार आकड्यावर पैसे घेऊन चालवत असल्याचे आढळून आल्याप्रकरणी दोघांवर घोडेगांव पोलीस ठाण्यात सोमवारी ( दि . ६ ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घोडेगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोडेगांव येथील एका हॉटेलसमोर झाडाखाली सोमनाथ सुदाम उर्किडे ( रा . घोडेगाव ) हा मोबाइलद्वारे बेकायदा विनापरवाना कल्याण मटका नावाचा जुगार आकड्यावर पैसे घेऊन चालवत असल्याची खबर पोलिसांना मिळाली . पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण २ हजार २२५ रुपयांच्या रक्कम आढळून आली . सोमनाथ उकिर्डे हा दादा बाणखेले ( पूर्ण नाव माहीत नाही ) यांच्या सांगण्यावरून हा जुगार चालवत असल्याचे त्याने सांगितले . घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस जवान अमोल काळे यांनी मुंबई जुगार कायद्यानुसार फिर्याद दिली आहे . पुढील तपास घोडेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान युवराज भोजने करीत आहेत .

वडाचीवाडी येथून दारूसाठा जप्त

तसेच चास – वडाचीवाडी ( ता . आंबेगाव ) येथे बेकायदा दारूविक्रीचा १ हजार ५४२ रुपयांचा साठा घोडेगाव पोलिसांनी जप्त केला आहे . याप्रकरणी सागर रमेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक माहितीनुसार , वडाचीवाडी येथे सागर जाधव हा बेकायदा दारू विक्री करत होता .त्या वेळी पोलिस तेथे गेले असता त्यास पोलिसांची चाहूल लागली आणि तो पळून गेला .पोलिसांनी तेथील १ हजार ९ २ रुपयांच्या दारूच्या २१ बाटल्या , ४५० रुपयांच्या तीन सीलबंद दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या आहेत.घोडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस जवान अमोल काळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे .सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान एम.एम.झनकर तपास करीत आहेत .

Previous articleजुन्नर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहचली १०५ वर
Next articleमंचर मध्ये नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई