शरद पवारसाहेबच माझे गुरू;माझ्या जडणघडणीत पवार साहेबांचे मोठे योगदान- जयंत पाटील

अमोल भोसले,उरुळी कांचन — प्रतिनीधी

शरद पवारसाहेबच माझे गुरू… माझ्या जडणघडणीत पवारसाहेबांचे मोठे योगदान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पवारसाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आज संपूर्ण भारतात गुरूपौर्णिमा साजरी केली जात आहे. प्रत्येकजण आपल्या गुरुजनांप्रती विविध माध्यमातून आदर व्यक्त करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील खासदार शरद पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत एक व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर प्रसारीत केला आहे.
शरद पवार यांच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करत असताना जयंत पाटील यांनी बऱ्याचशा आठवणींना उजाळा दिला आहे. जयंत पाटील म्हणतात, बापू हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते त्यामुळे आमच्या घरी बऱ्याच थोरामोठ्या नेत्यांची उठबस होत असे मात्र पवारसाहेबांच्या व्यक्तीमत्वाविषयी मला पूर्वीपासूनच आकर्षण होते. इतरांपेक्षा हा नेता वेगळा वाटायचा. पवारसाहेबांमध्ये फक्त विकासाचा ध्यास दिसायचा असे जयंत पाटील यांनी व्हिडीओत म्हटले आहे.
शिमला येथे एआयसीसीचे अधिवेशन होते तेव्हा मीही बापूंसह अधिवेशनाला गेलो होतो. पवारसाहेब आणि आमची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली होती. तेव्हा आदरणीय पवारसाहेबांना पहिल्यांदा जवळून अनुभवता आले असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

पवारसाहेबांना मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म काही पूर्ण करता आली नाही. तेव्हा मुख्यमंत्री बदलण्याची एक मोहीम सुरू झाली होती. तेव्हा आमच्या सांगलीच्या सर्व आमदारांनी सुधाकर नाईक यांना पाठिंबा देण्याचे ठरवले होते त्यामुळे मलाही सुधाकर नाईक यांना पाठिंबा द्यावा लागला. कालांतराने तेही सरकार पडले आणि आदरणीय साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले. मला वाटलं साहेब आता काही आपल्या कामाची नोंद घेणार नाही. एकेदिवशी आमदार म्हणून एक काम घेऊन साहेबांकडे गेलो होतो. चिठ्ठीत माझं नाव पाहताच त्यांनी मला सर्वात आधी बोलावून घेतले व जेवणाच्या वेळी भेटायला ये म्हणून सांगितले. भेटीदरम्यान साहेबांनी माझा मतदारसंघ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मी साहेबांच्या दौऱ्याचे संपूर्ण नियोजन केले व साहेबांना एका कार्यक्रमानिमित्त बोलावले. मोठी जंगी सभा घेतली. तेव्हापासून साहेबांनी मला जवळ केले आणि माझ्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली अशी आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली आहे.

Previous articleगंगापूर खुर्द येथे धाडसी दरोडा, ७ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला
Next articleप्रसिद्धी पेक्षा कामाला महत्त्व देणारे बाप – लेक