प्रसिद्धी पेक्षा कामाला महत्त्व देणारे बाप – लेक

अमोल भोसले उरुळी कांचन —प्रतिनिधी

महाआघाडीचे सरकार आले आणि काही महिन्यातच covid-19 सारखे मोठे संकट संपूर्ण देशासमोर उभे ठाकले. यात महाराष्ट्र आघाडीवरच होता कारण महाराष्ट्र हे पुढारलेले राज्य. शिक्षण आणि उद्योगाच्या निमित्ताने इथे अनेक लोक बाहेरून येत जात असतात. त्यामुळे राज्यावर करोणाचे संकट अधिका अधिक वाढत होते. सरकार नवीन होते, सरकारमध्ये अनुभवी लोकं असली तरी हे संकट सहज रित्या हाताळणे जिकीरीचे जात होते.

माननीय मुख्यमंत्री जनतेशी सातत्याने संवाद साधत होते. आरोग्यमंत्री सुद्धा माध्यमांमध्ये दिसत होते. त्या त्या खात्याचे सर्व मंत्री माध्यमांसमोर येत होते. मात्र सरकारमधील एक अति महत्त्वाची व्यक्ती मात्र कित्येक दिवस झाले तरी पडद्यावर येत नव्हती, कुठेही बोलताना दिसत नव्हती. ती व्यक्ती सकाळी ७ वाजता मंत्रालयात जावून आणि रात्री उशिरापर्यंत मंत्रालय थांबून या राज्याचा गाडा या भयानक संकटातून पार करून देण्यासाठी झटत होती. राज्यातील सर्व बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, आदी सर्वच लोकांना जमेल तसे अगदी फोन करून आधार देत होती. ती व्यक्ती कोण होती तर माननीय नामदार अजित दादा पवार.

एवढ्या मोठ्या राज्यात इतक्या महत्त्वाच्या पदावर काम करीत असताना प्रसिद्धीपासून लांब राहून राज्यातील दीनदुबळ्यांसाठी अहोरात्र काम करणे सोपे नसते. त्यासाठी अजितदादाच असावे लागते. ते कोणालाही शक्य नाही. आणि असेच काम त्या दरम्यानच्या काळात पार्थ पवारही करीत होते, ते पुढे येईलच.

माध्यमांमध्ये तसेही अजितदादा फार दिसत नाहीत. लोकांची कामे करणे व त्यांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर असतो. यालाच ते त्यांचे कर्तव्य समजतात. २०१४ च्या आधीही सरकारमध्ये असताना दादांनी अनेक लोकांची कामे एका एका फोनवर मार्गी लावली. ज्यांना दादांचा प्रत्यक्ष अनुभव आलाय ती लोकही दादांबाबत भरभरून बोलतात, कौतुक करतात. त्यांच्या बोलण्यात अजितदादां बाबत एक आपलेपणाची भावना निर्माण झालेली असते. दादांना समाजमाध्यमांपेक्षा प्रत्यक्ष लोकांमध्ये रहायला आवडते. माध्यमे मात्र इतके काम करणाऱ्या व बाहेरून कडक पण आतून एकदम मऊ, जीवाला जीव लावणार्या व्यक्ती बद्दल तितकासा आपलेपणा का दाखवत नाहीत? हा प्रश्न मला अनेक वेळा पडत आलेला आहे .इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या उदयानंतर त्या माणसा इतकी खोटी टिका राज्यात दुसरे कोणी सहन केली नसेल.

तरीही हा माणूस खचला नाही, आणि खचतही नाही. तो अजूनही त्याच जोमाने राज्यातील जनतेसाठी काम करतोय. आणि अजितदादांच्या याच पावलावर पाऊल ठेवून पार्थ पवार ही काम करीत आहेत. तेही प्रसिद्धीपासून बरेच लांब राहून.

असे म्हणतात की ‘बोलणाऱ्याचे दगडही विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाही’. तसेच काहीसे पार्थ पवारांच्या बाबतीत झाल्याचे दिसत आहे.

पार्थ दादाही माध्यमांपासून दूर असल्याचे आपणास पाहायला मिळते. ज्याप्रमाणे अजितदादांना माध्यमांपासून दूर राहण्याचा, पत्रकारांसोबत तितकीशी मैत्रीपूर्ण संबंध नसल्याचा फटका बसला व सातत्याने कमालीचे भारी काम करूनही मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली, साधारणता तसेच काहीसे पार्थ पवार यांच्या बाबतीत होताना आपणास लोकसभेच्या निवडणुकांपासून दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक संकटे आली. यात सुरुवातीला सातारा, सांगली,कोल्हापूरला महापुराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. त्यावेळी पार्थ दादांनी हवे तेवढे अन्नधान्य असेल, पिण्याचे पाणी असेल किंवा आणखी काही असेल अशी प्रचंड मदत केली. त्यानंतर मधे दादांचे काम तसे सुरूच होते. आणि आता गेल्या काही महिन्यांपासून सगळ्या जगाला करोणाच्या संकटाने घेरले आहे. आपल्या राज्यात देखील परिस्थिती गंभीर झाली होती. लाॅकडाऊन मुळे लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. अनेक विद्यार्थी पुणे ,मुंबईत अडकून पडले होते. अनेक कामगार, मजुरांच्या जेवणाचे हाल होत होते. त्यावेळीही दादांनी मोठ्या प्रमाणात काम केले. तब्बल २५,००० लोकांना रोज जेवणाची व्यवस्था त्यांच्यामार्फत राज्यातील विविध भागात केली जात होती. काही ठिकाणी ते आजतागायत सुरू आहे.तीन लाखांपेक्षा जास्त मास्क पार्थदादांनी वाटले.सॅनिटाईझरचे वाटप केले.

संकटांची ही मालिका राज्यात इथेच थांबली नाही. तर हे सर्व सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात ‘निसर्ग चक्रीवादळाने’ मोठ्या प्रमाणात नुकसान केले. लोकांची शेती नष्ट झाली, घरे पडली, लोकांचे प्रचंड हाल झाले. यावेळीही हा माणूस धावून गेला व तब्बल १७ टन गहू आणि तांदूळ व दहा हजार लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या रायगडला पाठवून दिल्या. परंतु एवढे सगळे मी करतोय असा गवगवाही कुठेही केला नाही. अगदी शांततेत हे सर्व काम सुरू होते व सुरू आहे. परंतु या कामाची दखल लोक का घेत नाही हे मला अद्यापही समजले नाही.

छत्रपती संभाजी महाराजांची देखील काही विशिष्ट लोकांनी जाणीवपूर्वक खोटा इतिहास लिहून बदनामी करण्याचा प्रयत्न केला व काही घटक आजतगायत करीत आहेत. परंतु हा राजपुत्र हुशार होता, आभ्यासू होता व शूरवीर योद्धा होता हे कालांतराने इतिहासाच्या पुर्नमांडणीतून लोकांसमोर आलेच. लोकांचे अनेक गैरसमज दूर झाले.

विशिष्ट प्रवृत्तीमुळे असे अनेक गैरसमज अनेकांच्या बाबत होत असतात. माझ्याही बाबतीत असे काही वेळा झाले. परंतु काही कालावधीनंतर सत्य हे लोकांसमोर येत असते व जनता ते स्वीकारत असते. आणि पार्थदादांच्या बाबतीत असे निश्चित होईल याची मला खात्रीच आहे. यावर मला गालिबच्या काही ओळी आठवतात.

मेरे बारे में कोई राय मत बनाना ग़ालिब,
मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी..!

शब्दांकन,
आकाश भरत झांबरे
सरचिटणीस: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस

Previous articleशरद पवारसाहेबच माझे गुरू;माझ्या जडणघडणीत पवार साहेबांचे मोठे योगदान- जयंत पाटील
Next articleअजितदादाचें काँल रेकाँडिंग ऐकून डॉक्टर आले ताळ्यावर