चला यंदा साजरी करु शाश्वत शिवजयंती – खासदार डॉ.अमोल कोल्हे

अमोल भोसले,पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली ती म्हणजे स्वराज्य. शिवरायांची यंदा ३९१ वी जयंती, यानिमित्ताने प्रत्येक गावात ३९१ झाडे लावू या आणि ती जगवू या. या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या, असे आवाहन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीच्या निमित्ताने खासदार डॉ. कोल्हे यांनी वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातन विभागाच्या सहकार्याने शिवनेरी गडावर ३९१ देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. याच संकल्पाची व्याप्ती वाढवत खासदार डॉ. कोल्हे यांनी गावोगावच्या ग्रामपंचायतींना ३९१ देशी झाडे लावून ती वर्षभर जगविण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

प्रत्येक गावात ३९१ देशी वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेनेही सहकार्य केले असून ही झाडे लावण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत कार्यक्रम राबविण्याचे आवाहनही ग्रामपंचायतींना केले आहे. तसेच ज्या ग्रामपंचायती या उपक्रमात सहभागी होतील त्यांनी वृक्षारोपणाची छायाचित्रे आपल्याला पाठवावीत आपण आपल्या फेसबुक पेजवर या ही छायाचित्रे माहितीसह प्रसिद्ध करणार असल्याचचेही खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारं प्रत्येक गाव आणि शिवभक्त या उपक्रमात सहभागी होईल. हा उपक्रम यशस्वी करुन शाश्वत शिवजयंती साजरी करतील असा मला विश्वास आहे. त्यासाठी चला संकल्प करु या. माझी शिवजयंती…. शाश्वत शिवजयंती!

Previous articleॲड सरिता खेडेकर यांची शिरुर बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड
Next articleवन विभाग शिवनेरीवर फुलविणार देवराई, जैन ठिबक कंपनीच्या सीएसआर मधुन २१ लाखांची ठिबक सिंचन सामुग्री बसविण्यात येणार