वन विभाग शिवनेरीवर फुलविणार देवराई, जैन ठिबक कंपनीच्या सीएसआर मधुन २१ लाखांची ठिबक सिंचन सामुग्री बसविण्यात येणार

नारायणगाव – (किरण वाजगे)

छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी गडावर वन विभागाच्या वतीने देवराई साकारण्यात येत आहे. यासाठी जैन ठिबक उद्योग समूहाच्या वतीने सामाजिक दायित्वातुन पहिल्या टप्प्यात सुमारे २१ लाखांची ठिबक सिंचन सामुग्री बसविण्यात येणार आहे. हा प्रकल्प जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या पुढाकाराने आणि पुरातत्त्व विभागाचे सहकार्याने राबविला जाणार असल्याची माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी दिली.

याबाबत गौडा म्हणाले,‘‘शिवनेरी किल्‍ल्याच्या संवर्धन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत किल्ल्यावरील जैवविविधता संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात येते. मात्र ऐन उन्हाळ्यातील चार महिने पाण्याची टंचाई जाणवू लागल्यानंतर झाडांना पाणी देणे अडचणीचे होते. ही अडचण दूर व्हावी यासाठी जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या पुढाकाराने जैन उद्योग समूहाला शिवनेरी किल्ल्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा देण्याबाबत विनंती केली होती. या विनंतीला जैन समुहाचे संचालक अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर जैन समूहाचे तांत्रिक अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहाय्यक बी.बी.जंगले, वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे आणि सह्याद्रीचे पदाधिकारी यांनी किल्ल्याची संयुक्त पाहणी करत, अहवाल सादर केला. या अहवालानुसार अंबरखाना इमारतीच्या मागील वनक्षेत्रावर सुमारे २५ एकर क्षेत्रावर देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठीच्या सिंचनाची सुविधा जैन उद्योग समूहाच्या वतीने केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जैन ठिबकच्या वतीने सुमारे २१ लाखांची अत्याधुनिक सामग्री सामाजिक दायित्वातुन बसविण्यात येणार आहे.‘‘
याबाबत बोलताना जैन ठिबकचे प्रादेशिक व्यवस्थापक रवींद्र गाडीवान म्हणाले,‘‘सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या विनंतीला अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, मला शिवनेरीच्या सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार माझ्यासह सह्याद्रीचे सदस्य, वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह गडावरील पाण्याच्या टाक्या, उपलब्ध पाण्याचा साठा, त्याचा कालावधी याची पाहणी करत, ठिबक सिंचनाचा आराखडा आमच्या कार्यालयासह वन विभागाला सादर केला. त्याला जैन यांनी मान्यता दिली आहे. संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधत आम्ही शिवनेरी वरील हिरवाई फुलविण्याबरोबरच जैवविविधता संवर्धनाची कामे करु.‘‘
सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री म्हणाले,‘‘ शिवनेरी विकास आणि संवर्धन प्रकल्पाशी आम्ही पहिल्यापासून निगडित आहोत. विविध शासकीय विभागांशी समन्वय साधत विविध विकासकामे सुचवीत असतो. यामध्ये वन आणि पुरातत्त्व विभागाला सुचविलेल्या विविध कामांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असेच काम आम्ही जैन ठिबक उद्योग समूहाला सुचविले. त्याला अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवनेरीवरील जैवविविधता संवर्धनासाठी देशी फळझाडांची लागवड आणि संवर्धन आम्ही करु.‘‘

पुढील झाडांचे होणार वृक्षारोपण आणि संवर्धन

शिवनेरी गडावरील जैवविविधता संवर्धनासाठी, पक्षी थांबे होण्यासाठी फळ असणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. यामध्ये गावरान बोरे, चिंच, आंबा, करवंद, फणस, जांभुळ आदि विविध प्रकारच्या सुमारे १२५ देशी फळ फुलांची झाडे असणार आहेत.

Previous articleचला यंदा साजरी करु शाश्वत शिवजयंती – खासदार डॉ.अमोल कोल्हे
Next articleघोडेगाव परीसरामध्ये विना मास्कचे फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करणार- प्रदिप पवार