जमीन मालकाला मयत दाखवुन केली दस्तनोंदणी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रमोद दांगट,पुणे- जमीन मालकाचा मृत्यू झाल्याचे दाखवून तिघांनी एकतर्फी दस्त नोंदवून जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अविनाश रामभाऊ कानगुडे (वय ४४, रा. मुळशी खुर्द ) यांनी फिर्याद दिली असून त्यानी दिलेल्या फिर्यादीनुसार राजाराम पुणेकर, मीना पुणेकर व चेतन पुणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या फिर्यादी अविनाश कानगुडे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये बळवंत दातार यांच्याकडून कर्वेनगरमधील महर्षीनगर भागात १६ हजार चौरस फूट जागा विकत घेतली होती. दरम्यान बळवंत दातार यांनी १९८४ मध्ये १० हजार चौरस फूट जागा राजाराम पुणेकर यांना ९९ वर्षांसाठी भाडेकराराने दिली होती. पंरतु २००० पासून पुणेकर यांनी दातार यांना मिळकतीचे भाडे दिले नव्हते. दातार यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये पुणेकर यांना करारनामा रद्द झाल्याची नोटीस पाठविली. त्यानुसार पुणेकर यांनी दातार यांच्या नोटिशीला उत्तर देताना २० हजार चौरस फूट जागा त्यांच्या ताब्यात असल्याचे नमूद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे दातार यांच्या लक्षात आले. चौकशीत २३ एप्रिल २००८ मध्ये राजाराम पुणेकर यांनी हवेली उपनिबंधक कार्यालयात खोट्या मजकुराचे घोषणापत्र लिहून नोंदवले होते. त्यामध्ये बळवंत दातार मृत झाल्याचे दाखवून एकतर्फी दस्त नोंदविला असल्याचे उघड झाले याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleवाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश लांडगे यांची बिनविरोध निवड
Next articleचाकण आळंदी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश फलके, उपाध्यक्षपदी शरद भोसले यांची निवड