कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत कृषी ग्राहकांसाठी वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद

अमोल भोसले,उरुळी कांचन

कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत कृषी ग्राहकांसाठी वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पूर्व हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई सरपंच दीपक गावडे यांच्यासह पाच शेतकऱ्यांनी दहा कृषिपंपांची चालू बिल व मूळ थकबाकीचे सात लाख आठरा हजार रुपये महावितरणकडे भरले व थकबाकीमुक्ती मिळविली. धोरणानुसार या सर्वांना एकूण थकबाकीमध्ये तब्बल ९ लाख ३५ हजार रुपये सवलत मिळाली आहे. मुळशी विभाग अंतर्गत सध्या गावोगावी जाऊन कृषी ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये मिळणारी व्याज व विलंब आकाराची सूट तसेच मूळ थकबाकीमध्ये ५० टक्क्यांपर्यंतची सूट आदींची माहिती देण्यात येत आहे. वाडेबोल्हाई येथे ग्रामपंचायतीमध्ये आयोजित कार्यक्रमात कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले, उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, सहायक अभियंता दीपक बाबर व नईम सुतार यांनी थकबाकीमुक्ती योजनेबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.

यावेळी सरपंच दिपक गावडे तसेच गुलाब पायगुडे, प्रकाश पराड, पुंडलिक पायगुडे, मालन पायगुडे यांनी त्यांच्या दहा कृषिपंपांच्या वीजजोडण्यांची थकबाकी व चालू बिल असा एकूण आठ लाख तीस हजार पाचशे चौदा रुपयांचा भरणा केला. कृषी धोरणानुसार या सर्वांच्या थकीच वीजबिलांतील व्याज, विलंब आकार व मूळ थकबाकीचे पन्नास टक्के असे एकूण नऊ लाख ३५ हजार १०५ रुपये माफ करण्यात आले आहे. भरणा केलेल्या वीजबिलाच्या रकमेतील ३३ टक्के रक्कम संबंधीत ग्रामपंचायत क्षेत्र व ३३ टक्के रक्कम जिल्हा क्षेत्रातील वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

कृषी ग्राहकांच्या थकीत वीजबिलातील विलंब आकार, व्याज व मूळ थकबाकीमध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत माफी मिळत असल्यामुळे या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Previous articleमेहबूब काझी यांना स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार प्रदान
Next articleरोजगार हमी योजनेतून गावातच काम मिळाल्याने रोजगाराचा प्रश्न मार्गी