महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ – महेश तपासे

अमोल भोसले,पुणे

२०२४ च्या विधानसभा निवडणूका १०० टक्के मतपत्रिकेवर झाल्यास लोकांच्या मनातला खरा पक्ष कुठला हे निश्चितच सर्वांच्यासमोर येईल आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकणारे पक्ष हद्दपार होतील व’ दूध का दूध पानी का पानी’ होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३२८ प्रमाणे राज्यातील निवडणुकांबाबत कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे आणि त्या अनुषंगाने विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिकारी वर्गाची बैठक घेऊन सविस्तर कायदेशीर माहिती घेतली व कायदा करण्याबाबतच्या सूचना दिल्या. आता मतदारांना ईव्हीएम सोबत मतपत्रिकेचाही पर्याय उपलब्ध असेल जेणेकरून ईव्हीएममध्ये होणारे घोटाळे हे पूर्णपणे टाळता येतील तसेच मतदारांनी दिलेले आपले मत हे योग्य पक्षाच्या उमेदवाराकडे जाईल व त्यात कुठलाही गैरप्रकार होणार नाही अशा अनुषंगाने याबाबतची चर्चा झाल्याचे महेश तपासे यांनी सांगितले आहे.

जगातल्या विकसित देशांमध्ये ईव्हीएमचा वापर होत नाही व मतदार कागदी मतपत्रिकेचा वापर करून मतदान करतात. मात्र भारतात ईव्हीएमचा आजही वापर होत आहे. शिवाय या मशीनमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तसेच दिलेले मत दुसरीकडे जात असल्याच्या असंख्य तक्रारी अनेक राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी भारतीय निवडणूक आयोगाला केलेल्या आहेत हे कोणीही नाकारू शकणार नाही.

आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकेचा वापर करण्याच्या संदर्भात कायदा निर्माण होत असताना काही पक्षातील लोकांच्या पोटात गोळा उठणे साहजिकच आहे परंतु लोकशाही सुदृढ व्हावी यादृष्टीने महाविकास आघाडीचे हे पाऊल असल्याचे महेश तपासे म्हणाले.

Previous articleअवैध धंदे करणाऱ्यांवर मंचर पोलीसांची कारवाई
Next articleअवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारा कार्यकर्ताच निघाला दारू विक्रेता