वजीर सुळक्यावर शहीद जवान संभाजी राळे यांना पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी वाहिली श्रद्धांजली

पुणे- 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील या गिर्यारोहकांनी वजीर सुळक्यावर ध्वजारोहन केले व शहीद जवान संभाजी राळे (ता. खेड) यांना श्रद्धांजली अर्पण केली.

गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महराष्ट्रातील सर्वांत अवघड असलेला २८०-३०० फूट उंच असा हा वजीर सुळका. ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळ असलेला हा सुळका, अकरा जणांच्या चमूने शनिवारी साडेपाच तासांच्या खडतर प्रयत्नांनंतर सर केला. विधिवत सुळका पुजन झाल्यानंतर राष्ट्रगीत घेऊन या मोहिमेला सुरुवात झाली. नाशिक च्या पॉइंट ब्रेक अ‌ॅडव्हेंचर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली फोर्ट अ‌ॅडव्हेंचर ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्यांनी तिरंग्याला सलामी देत ही अवघड कामगिरी साधली.

शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी ही मोहीम पुणे करांच्या चमूसाठी अविस्मरणीय ठरली. त्यांच्या या अगळ्या वेगळ्या पद्धतीने राष्ट्रीय सण साजरा करण्याच्या कल्पनेचे व त्यांच्या अथक परिश्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर मांडावा तसा हा सुळका दिमाखात उभा आहे. नजर टाकली तरी अंगाला दरदरून घाम फोडणारा हा सुळका सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. पॉइंट ब्रेक ग्रुपचे जॉकी दादा, चेतन, दर्शन, राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली फोर्ट अ‌ॅडव्हेंचर ग्रुपचे अक्षय भोगाडे, सचिन पुरी, प्रियांका जढार, विशाल तोंडचिरकर, भाग्येश जाधव, संदीप राऊत, सारंग भोईटे, विकी देशमुख, हर्षवर्धन शिंदे, ऋषिकेश कुलकर्णी, पुरुषोत्तम राऊत या गिर्यारोहकांनी ही मोहीम फत्ते केली.

वांद्रे या गावापासून या मोहिमेला सोमवारी पहाटे सुरुवात झाली. अंगाला झोंबणारा पहाटेचा गारवा आणि समोर वजीर सुळका हे दोन्ही आव्हाने पेलत या चमूने अतिशय शिस्तबद्ध चढाई केली. जसजसे सुळक्यावर जात होते, तसतसा सुळका अधिक चिंचोळा होत जातो. साधारण दीडच्या सुमारास हा सुळका सर झाला. विशेष म्हणजे नवख्या गिर्यारोकांना घेऊन ही मोहीम फत्ते करण्याचे अग्निदिव्य जॉकी साळुंके, सचिन पुरी व अक्षय भोगाडे यांनी लीलया पेलले. सर्व सुरक्षेची काळजी घेऊन हे खडतर आव्हान पूर्ण केले. 100 पेक्षा जास्त किल्ले सर करणारे पुरुषोत्तम सर यांना हा अवघड सुळका सर केल्यानंतर गहिवरून आले हीच या मोहिमेची पोच पावती ठरली. सर्व गिर्यारोहक सुखरूप खाली उतरल्यानंतर या आरोहण मोहिमेची सांगता झाली.

भविष्यात अशाच मोहिमा करून युवा गिर्यारोहकांना सह्याद्रीच हे रौद्र शंभो रूप दाखवून जीवनात पुढे संघर्ष करण्याची जिद्द मिळवून देण्याचा मानस सचिन व अक्षय यांनी बोलून दाखवला…

शब्दांकन: युवा गिर्यारोहक अक्षय भोगाडे (राजगुरुनगर, पुणे)

Previous articleशशिकांत मोरे यांचा “युवा जागृती विकास” पुरस्काराने गौरव
Next articleअन् एकवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र