पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि ‘ससून हॉस्पिटल ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने “ राष्ट्रीय युवा दिनाच्या ” निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोविड- १९ साथ-रोगाच्या कारणामुळे जाणवत असलेला रक्ताचा तुटवठा लक्षात घेऊन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या परिपत्रकानुसार या रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. अडसूळ म्हणाले, “ रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एक रक्तदाता तीन व्यक्तिच्या रक्ताची गरज भागवू शकते. शारीरिक दृष्ट्या सक्षम व्यक्तीने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करायलाच पाहिजे, रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचविणे ही राष्ट्रीय सेवा आहे.”
रक्तदान शिबिरासाठी ससून सर्वोपचार हॉस्पिटल ब्लड बँकेच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. आशा कुबडे, समाजसेवा अधीक्षक (वैद्य) अरुण बर्डे व त्यांचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरासाठी उरुळी कांचन मधील ग्रामस्थ व महाविद्यालयीन विद्यार्थी असे एकूण ७७ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ड्रीम्स युवा सामाजिक प्रतिष्ठान, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियानाचे संतोष चौधरी व सहकारी, तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शैलेश गायकवाड व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. सुरुवातीला प्राचार्यांच्या हस्ते रक्तसंक्रमण अधिकारी, समाजसेवा अधीक्षक व इतर सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. आर. पिंजारी यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अडाले एल बी यांनी मानले. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन कु. काजल क्षिरसागर यांनी केले.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा समिती सदस्य प्रा. बोत्रे ए. पी, प्रा. गायकवाड एस. जे, प्रा. शिंदे ए एस, शारीरिक संचालक प्रा. डॉ. एस. एच. परदेशी, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. कानकाटे व्ही. एन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.

Previous articleवेगरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील सरपंच मिंनाथ कानगुडे
Next articleग्रामपंचायत निवडणुकां मध्ये गोंधळ व गैरप्रकार केल्यास कोणाचीही गय नाही – स.पो. निरीक्षक दत्तात्रय गुंड