वैद्यकीय सेवेच्या मदतीसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन

अतुल पवळे पुणे

कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव व संसर्ग रोखणेसाठी पुणे महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. पुणे महानगरपालिकेबरोबरच शहरातील सुजाण नागरिक, नागरी संस्था, स्वयंसेवी संस्था, विविध व्यावसायिक संघटना हे देखील कोरोनाविरूद्धच्या लढयात महानगरपालिकेला साथ देत आहेत.

सध्याची कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती आणि रूग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांना संक्रमणापासून संरक्षित करणे सद्‌यस्थितीस गरजेचे आहे, आणि त्याचबरोबर शहरातील कोरोनामुळे होणारे मृत्यु कमी करणे हे अत्यावश्यक आहे. पुणे शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करणेसाठी पुणे महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.असे महापौरांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेतर्फे सद्‌यस्थितीस शहरात एकूण १२ कोव्हीड केअर सेंटर्सची (CCC) उभारणी करण्यात आलेली आहे. भविष्यात ही संख्या वाढविण्याचा प्रयत्न चालू आहे. या कोव्हीड केअर सेंटर्समध्ये सद्‌यस्थितीस अंदाजे एकूण ४८७० बेड्‌स आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी याचा वापर होत आहे. परंतु कोव्हीड केअर सेंटर्समध्ये मध्यम लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी लागणारे ऑक्सिजन बेड्‌स आणि आवश्यक कुशल व अकुशल मनुष्यबळ कमी पडत असल्याने उपलब्ध साधन सामग्री अजून वाढविणे आवश्यक आहे.

माझ्या शहरातील सुजाण नागरिक, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था यांना महापौरांचे आवाहन आहे, की त्यांनी शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळासह आवश्यक सोयीसुविधांयुक्त कोव्हीड केअर सेंटर्सची उभारणी करून महानगरपालिकेस हातभार लावावा, आणि कोव्हीड-१९ विरुध्दच्या लढयात सहकार्य करावे.

Previous articleधोकादायक गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे व सुविधा उपलब्ध कराव्यात -आमदार दिलीप मोहिते पाटील
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस हा डिजिटल माध्यमातून संवाद साधणारा राज्यातील सर्वात मोठा पक्ष-जयंत पाटील