राष्ट्रवादी काँग्रेस हा डिजिटल माध्यमातून संवाद साधणारा राज्यातील सर्वात मोठा पक्ष-जयंत पाटील

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन –प्रतिनिधी

राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय या अभियांतर्गत राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सदस्यांचा अभिप्राय मागवला होता त्यामध्ये तब्बल ७ लाख ६१ हजार ३ सदस्यांनी आपला अभिप्राय नोंदवला असून राष्ट्रवादी काँग्रेस हा डिजिटल माध्यमातून संवाद साधणारा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान सुरू करण्यात आले होते. मात्र अनेकांना अभिप्राय नोंदवता आला नसल्याने या अभिप्राय अभियानाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

या अभियानात अभिप्राय नोंदवण्याची अंतिम तारीख ही २५ जून होती परंतु अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपले अभिप्राय नोंदवता न आल्याने या अभियानाची मुदत वाढवण्याची विनंती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी पक्षाने अभिप्राय अभियानाची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली होती.

या अभियानाला सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्यामुळे २५ जूनपर्यंत जवळपास ३ लाख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. दिनांक ३० जून रात्री १० वाजेपर्यंत आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्यानुसार ३० जूनपर्यंत ७ लाख ६१ हजार ३ जणांनी आपला अभिप्राय नोंदवला आहे. त्याबद्दल सर्व सदस्यांचे, कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.