सुरक्षारक्षक नसल्याने आंबेगाव तालुक्यात एटीएम केंद्रांची सुरक्षा रामभरोसे

सिताराम काळे,घोडेगाव

आंबेगाव तालुक्यातील बहुतेक एटीएम सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकच तैनात केलेले नाही. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ना. आणखी कशाला पाहिजे सुरक्षाव्यवस्था? असे समजुन बॅंका निर्धास्त होत असल्याने ही एटीएम सेंटर रामभरोसेच असल्याचे आढळून येत आहे.

मंचर शहरातील मुळेवाडी रोड येथील अॅक्सिस बॅंकेचे एटीएम मशिनच चोरटयांनी रात्री (दि. २६ रोजी) पाच लाखाच्या रकमेसह लंपास केली. त्यावेळी तालुक्याच्या इतर भागातील विविध बॅंकांचे एटीएम सेंटर २४ तास शटर उघडी ठेवून सुरक्षित आहेत का? बहुतेक एटीएम सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकच तैनात केलेले नाही. प्रतिप्रर्धी बॅंकांवर मात करण्यासाठी प्रत्येक बॅंक आपल्या एटीएम सेंटरचे जाळे वाढवत आहे. आमची इतकी एटीएम सेंटर आहेत, अशी जाहिरात बॅंका करत असतात. शक्य असेल त्या ठिकाणी एटीएम सेंटर सुरक्षाव्यवस्था विना उघडली जात आहेत.

बॅंकांच्या शाखांना लागुनही एटीएम सेंटर असतात अशा ठिकाणी मात्र सुरक्षारक्षक दिसतात. कारण शाखा आणि एटीएम सेंटर दोन्ही असल्याने हे सुरक्षारक्षक तैनात असतात. परंतु केवळ एटीएम सेंटर असलेल्या ठिकाणी सुरक्षारक्षकाचा पत्ता नसतो. बहुतेकवेळा याच ठिकाणी एटीएममधील पैसे चोरण्याचा चोरटयांचा डाव असतो, याची कल्पना असुनसुध्दा बॅंका आपल्या एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नेमण्यास टाळाटाळ करत आहे. कॅमे-यात आपली चोरी पकडली जाऊ नये, यासाठी चोरांनी एटीएम सेंटरमधील कॅमेरावर स्प्रे मारला असल्याचे मंचर येथील मुळेवाडी रस्त्यावरील एटीएम सेंटरमध्ये घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होते.

एटीएम सेंटर लुटण्यासाठी दरोडेखोर आल्यास बहुतेक ठिकाणी निशस्त्र असलेले सुरक्षारक्षक दरोडेखोरांचा सामना कसा करतील, हा देखिल प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र याकडे संबंधित बॅंकांना कोणतेही गांभीर्य नसल्याने एटीएम सेंटर सुरक्षा रामभरोसे असल्याचे निदर्शनास येत आहे.

Previous articleआदिनाथ वैंष्णव योगपिठाचे योगी शंखनाद महाराज यांचे निधन
Next articleशासकीय जागेतील झाडे तोडल्याने घोडेगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल