आदिनाथ वैंष्णव योगपिठाचे योगी शंखनाद महाराज यांचे निधन

अमोल भोसले,उरुळी कांचन

सिध्द सदगुरु शांतिनाथ महाराज पंढरपूरकर यांचे परमशिष्य श्रीक्षेत्र आळंदी येथे नाथ संप्रदायाची परंपरा चालविणारे आदिनाथ वैंष्णव योगपिठाचे योगी शंखनाद महाराज (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

भीमेच्या पवित्र तीरावर चिंचबन कानगाव (ता.दौंड) याठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार त्यांंना समाधी देण्यात आली. मुळचे पुरंदर तालुक्यातील रिसे येथील मुळीक घराण्यातील असून १९६२ मध्ये शांतिनाथ महाराज यांच्या समवेत आले. १९६५ मध्ये त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. त्यानंतर पिंपळगाव येथील मठामध्ये सतरा वर्षे निवास करुन आपल्या कार्यास सुरुवात केली.

या काळात ज्ञानेश्वरीचे १०८ पारायण, राहु ते पंढरपूर व राहु ते आळंदी असा आषाढी एकादशी व कार्तिकी दिंडी सोहळा सुरु केला.१९८१ मध्ये आळंदीत मठाची स्थापना करीत तिथेही ज्ञानेश्वरीचे १०८ पारायण, नियमित अन्नदान, कोरोना काळातही मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले.

आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्था अनेक नामवंत कीर्तनकार यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्व संबंध होते. समाधी सोहळ्यास शिष्य परिवारासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

Previous articleजनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला – अजित पवार
Next articleसुरक्षारक्षक नसल्याने आंबेगाव तालुक्यात एटीएम केंद्रांची सुरक्षा रामभरोसे