आहुपे खोर्‍यात भात काढणीची कामे अंतिम टप्प्यात

सिताराम काळे, घोडेगाव

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोर्‍यातील भात काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली असुन भात झोडणीची लगबग सुरु आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात. पुणे जिल्ह्यातील एकुण भातक्षेञ ६३ हजार ८०० हेक्टर क्षेञापैकी ५ हजार १०० हेक्टर क्षेञावर आंबेगाव तालुक्यात भात लागवड केली जाते. गतवर्षापेक्षा चालु वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातल्याने भात क्षेञाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने भात पिकात घट झाल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.

प्रत्येक वर्षी रोहिणी व मृग नक्षञा मध्ये धुळवाफेत पेरण्या करत असतात. यावर्षी रोहिणी मृग नक्षञांपाठोपाठ आद्र व पुनर्वसु (कोर)या नक्षञांतही सुरुवाती पासुनच पावसाने चांगलीच साथ दिल्याने भात पेरणी केलेला वरचा दाणा व माती आड गेलेला दाणा उतरुण येवुन भात रोपे चांगल्या प्रकारे तरारु लागल्याने शेतकर्‍यांनी लागवडी उरकुन घेतल्या. या नंतर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी भात रोपे सडुन गेली तर काही ठिकाणी बांध फुटुन भात खाचरे गाडली गेली. दाट धुके व रोगीट वातावरणामुळे या भात पिकांवर करपा तांबेरा व खोड किडा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. या रोगांचा शेतकरी सामना करत असतानाच शेवटच्या परतीच्या पावसाने या भागामध्ये थैमान घातल्याने कसे बसे राहीलेले पिक आपल्या हाती लागेल या हेतुने आदिवासी बांधवांनी भात गेले महिना भरापासुन प्रथमत: हळव्या व नंतर गर्‍या भात पिकाच्या जाती काढण्यास सुरुवात केल्या असुन सध्या भात काढणीची कामे शेवटच्या टप्प्यात असुन भातझोडणीची लगबग सुरु आहे.

भात पिकांच्या हळव्या जातींमध्ये ढवळा तांबकुड कोळंबा या जातीच्या काढण्या उरकल्या असुन हळव्या जातीत जीर खडक्या आंबे मोहर इंद्रायणी या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे या वर्षी भात पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसुन भात उतारात घट झाली आहे. भाताच्या साळीं बरोबर पाकुड व पळंजाचा खच पडल्याचे पाहुन आदिवासी बांधवांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.

Previous articleपंचायत समिती मार्फ़त सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या योजनांची माहिती मिळावी -पासलकर
Next articleदस्तगिर इनामदार यांची अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड