भोसे येथे जमीन मोजणीच्या वादातून एकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

चाकण- जमीन मोजणीच्या वादातून भोसे ( ता.खेड) येथे एका शेतकऱ्याला शिवीगाळ, दमदाटी व हाताने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोसे गावातील पठारे वस्ती येथे ही घटना घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अविनाश दिलीप लोणारी ( वय – २६ वर्षे, रा. पठारे वस्ती, भोसे, ता. खेड ) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अंकुश वामन गांडेकर, शरद अंकुश गांडेकर, आकाश अंकुश गांडेकर व अतुल अरुण गांडेकर ( सर्व रा. पठारे वस्ती, भोसे ) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील भोसे हद्दीतील पठारे वस्तीवर अविनाश लोणारी यांच्या शेताशेजारी बाबा गुलाबराव कांडेकर यांनी सुरेश कुटे यांच्याकडून एक गुंठा जागा घेतली होती. त्यास येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांनी भूमीअभिलेख मोजणी अधिकारी खेड यांच्याकडून मोजणी केली होती. सदर मोजणीची निशाणी करून देण्याकरिता मोजणी अधिकारी व बाबा कांडेकर आणि अविनाश यांचे वडील दिलीप व आई शोभा तसेच अन्य लोक त्याठिकाणी आले होते. त्यानंतर मोजणी अधिकारी राम माळी हे तेथून निघून गेले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांना व नोटीस आलेल्यांना ही मोजणी मान्य नव्हती. त्यावेळी दिलीप लोणारी व शोभा लोणारी यांना आकाश अंकुश गांडेकर, शरद अंकुश गांडेकर व अंकुश वामन गांडेकर यांनी लोणारी यांना शिवीगाळ केली. गांडेकर यावेळी त्यांना म्हणाले की, आमचा एक माणूस येरवडा कारागृह येथून शिक्षा भोगून आला आहे, अशी धमकी दिली. त्यावेळी दिलीप यांनी हा प्रकार अविनाश यांना सांगितल्याने अविनाश हा तेथे गेला. त्यावेळी आकाश गांडेकर हा शरद याला म्हणाला की, अव्या ( अविनाश ) आला आहे. त्याच्याकडे जरा पाहू. यावेळी आकाश, अतुल व शरद गांडेकर यांनी अविनाश यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

    अंकुश वामन गांडेकर याने यावेळी मागचा पुढचा विचार न करता जमिनीत गाडण्यासाठी आणलेल्या सिमेंट पोलने अविनाश यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दोन्ही पायाच्या नडगीवर जबर हल्ला करून गंभीर जखमी केले. अविनाश यांच्यावर येथील एका खाजगी दवाखान्यात तातडीचे उपचार सुरु आहेत. अविनाश लोणारी यांच्या फिर्यादीवरून  चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुदाम हरगुडे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Previous articleचांडोली खुर्द येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली डोके आल्याने एकाचा मृत्यू
Next articleकळंब येथे तीन बिबट्यांच्या हल्ल्यात गाय ठार