वडिलांच्या डोळ्यासमोर १८ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

Ad 1

प्रमोद दांगट-पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील माथावस्ती परिसरात तोल जाऊन विहिरीत पडल्याने १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना (दि.६ )रोजी घडली आहे.रात्री उशिरा ग्रामस्थांनी विहिरीतील पाणी उपसल्यानंतर मृतदेह सापडला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील माथावस्ती परिसरात राहत असलेले कृष्णा सखाराम शेळके ( वय १८ ) हा (दि.६) रोजी सकाळी साडेबाराच्या सुमारास विहिरीवर अंघोळीसाठी गेला असता तो तोल जाऊन विहिरीत पडला.त्याच्या समवेत एक लहान मुलगी होती. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला असता आवाज ऐकून संबंधित मुलाचे वडील सखाराम शेळके हे मदतीसाठी धावून आले. वडिलांनाही नीट पोहता येत नव्हते मात्र मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी विहिरीत उडी घेतली मात्र दुर्देवाने त्यांना मुलाला वाचवता आले नाही व त्यांच्या डोळ्यासमोर त्याचा मुलगा कृष्णा शेळके हा विहिरीच्या पाण्यात बुडाला. विहिरीत पन्नास फूट खोल पाणी असल्याने त्याला शोधण्यासाठी अडचण येत होती.

मंचर पोलिसांनी विहिरीच्या पाण्यात कॅमेरा ५० फूट खोल पाण्यात टाकून संबंधित तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो तरुण पाण्यात अडकला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी एन. डी. आर. एफ. टीमला बोलावले होते मात्र त्यांना घटनास्थळी यायला उशीर लागणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी विद्युत मोटारी च्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसा करून मुलाच्या शोध घेतला. हे कुटुंब मूळ परळी वैजनाथ बीड येथील असून ते गावडेवाडी परिसरात मोलमजुरी करत होते. घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.