रिंगरोडची आखणी २५ किमी अंतरावर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षेतेखाली झालेल्या पी.एम.आर.डी.ए. च्या बैठकीत एम.एस.आर.डी.सी. च्या रिंगरोडची आखणी रिंगरोडपासून विस ते पंचवीस किमी अंतरावर असणे आवश्यक व हितावह असल्याचे पी.एम.आर.डी.ए. च्या पत्रात त्यांनी स्पष्ट केलेले असतानाही एम.एस.आर.डी.सी. प्रशासकीय अधिकारी याच आखणीचा आग्रह धरून मा. मंत्री महोदय यांची दिशाभूल करत आहे. पुण्याच्या पुर्व भागास पी.एम.आर.डी.ए. व सार्वजनिक बांधकाम विभाग असे दोन रिंगरोड मंजूर आहेत. पुणे शहराच्या कडेने असलेले राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग इत्यादि रस्ते जाणून बुजून विकसित केले जात नाही. शहराच्या रिंगरोडच्या नावाखाली केवळ पुणे शहराच्या उपनगराजवळील शेतजमिनीवर डोळा ठेवूनच या रिंगरोडचा अट्टाहास प्रशासन धरत आहे, असा आरोप रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेच्या बैठकीत सर्व शेतकर्यानी केला.

एम.एस.आर.डी.सी. चा रिंगरोडची आखणी पी.एम.आर.डी.ए. च्या रिंगरोडपासून पंचवीस किमी अंतरावर करण्यात यावी अशी मागणी सर्व शेतकर्यानी केली आहे.

या बैठकीस बिवरी, वाडेबोल्हाई, प्रयागधाम, सोरतापवाडी, गोलेगाव, मरकळ येथील शेतकरी उपस्थित होते. एम.एस.आर.डी.सी. च्या रिंगरोडच्या आखणी विरूध्द याच शेतकर्यांनी संस्थेमार्फत यापूर्वीच न्यायालयात धाव घेतलेली आहे व त्यास स्थगितीही मिळविली आहे.

शेतकर्यावर होणार्या या अन्यायाविरूध्द ज्यांनी संघर्ष करायला शिकवला ते रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक कै. रामदास ज्ञानोबा कामठे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना संस्थेच्या वतीने व उपस्थित शेतकर्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. आमचा जीव गेला तरी आम्ही आमच्या शेतजमिनी रिंगरोडला देणार नाही, असा निर्धार सर्व शेतकर्यानी यानंतर व्यक्त केला.

याप्रसंगी सोनबा चौधरी, बाळासाहेब चोरघे, जिजाबा गोते, गणेश चौधरी, रंगनाथ कड, प्रभाकर कामठे,दशरथ गोते, काळुराम गोते, महेंद्र झेंडे, सुदाम गोते, अमित चौधरी आदी उपस्थित होते.