खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश युक्रेन मध्ये अडकलेले विद्यार्थी महाराष्ट्रात परतले

पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी नुकतेच पुण्यात परतले.

भारतातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमधील केआयवायव्ही (KIYV) युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपल्याने त्यांना भारतात परत येणे गरजेचे होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विमानसेवा बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी होती. या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी खासदार डॉ. कोल्हे यांना ई-मेल, व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक अशा विविध माध्यमातून संपर्क साधून मदतीची विनंती केली होती.

डॉ. कोल्हे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद देत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करुन ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत फ्लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारने युक्रेनमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. त्यानंतर अन्य भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थीही परत येणे अपेक्षित असताना विमानात जागा देताना आपल्याला डावलण्यात येत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या.

डॉ. कोल्हे यांनी या तक्रारीची दखल घेऊन परराष्ट्रमंत्री जयशंकर व नागरी हवाई वाहतूक मंत्री यांच्याशी पुन्हा पत्रव्यवहार केला. डॉ. कोल्हे यांनी नेटाने व संयमाने परिस्थिती हाताळत पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस केआयवायव्ही (kiyv) युक्रेन – पुणे फ्लाईटमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार जवळपास ३०-४० विद्यार्थी गुरुवारी (दि. १८ रोजी) पुण्यात परतले. आपल्याला परत येण्यासाठी मदत करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी डॉ. कोल्हे यांचे आभार व्यक्त केले.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, युक्रेनमधून ही पहिली बॅच भारतात परत आली असून उर्वरीत सर्व विद्यार्थी परत येईपर्यंत आपण पाठपुरावा करणार आहोत. युक्रेन व्यतिरिक्त रशिया, किर्गिजस्तान येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठीही माझे प्रयत्न सुरू असून तेथील काही विद्यार्थी परतही आले आहेत. त्याचप्रमाणे नोकरी गमावलेल्या सौदी अरेबियातील महाराष्ट्रातील नागरिकांनीही परत आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. यापैकी अनेकांना ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत परत आणण्यात यश आले असले तरी अद्याप खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील नागरिक परदेशात विविध ठिकाणी अडकले आहेत. यापैकी असंख्य लोकं माझ्याशी संपर्क साधत आहेत. त्यांना माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील आहे, असे डॉ. कोल्हे म्हणाले.

Previous articleखंडणी मागितल्या प्रकरणी रांजनी येथील पोलीस पाटील व त्याच्या मुलाविरुद्ध फिर्याद दाखल
Next articleमाजी मंत्री महादेव जानकर यांनी शेळीपालन करणाऱ्या मोरे इंनोवेटीव्ह फार्म”ला दिली भेट