कुख्यात गुन्हेगार ज्वालासिंगच्या टोळीतील दोन अट्टल दरोडेखोरांना अटक

अमोल भोसले,उरुळी कांचन-

कोल्हापूर येथे २९ वर्षांपूर्वी दरोडा टाकून फरार झालेल्या  आंतरराज्य रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार ज्वालासिंगच्या टोळीतील दोन फरार आरोपींना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

 

काळ्या उर्फ दामू बरोट्या नानावत उर्फ कंजारभट ( वय ५९ रा.यवत इंदिरानगर ता.दौंड जि.पुणे ) व अरविंद उर्फ सेनीर रामलाल राजपूत  उर्फ कंजारभट ( वय ५८ रा.दत्तवाडी उरुळीकांचन ता.हवेली जि.पुणे ) या दोन अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.

 पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे आदेशाने गुन्हे शाखेकडून रेकॉर्डवरील, फरारी आरोपी पकडणे कामी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शुक्रवार  ( २ ऑक्टोबर ) रोजी पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला मुरगुड पोलीस ठाणे ( जिल्हा कोल्हापूर ) येथे २९ वर्षापूर्वी दाखल असलेल्या दरोडयाच्या दोन गुन्हयातील रेकॉर्डवरील दोन फरारी आरोपी उरूळी कांचन व यवत परिसरात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकास मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम ,सुभाष राऊत, गुरू गायकवाड, विदयाधर  निचित, प्रमोद नवले यांनी पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली त्या भागात वेषांतर करून फरारी आरोपींची माहिती काढली असता आरोपी नावे बदलून तेथे राहत असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी ते ऊरुळी कांचन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर आरोपींना पुढील तपासासाठी मुरगुड पोलीस स्टेशन ( जिल्हा कोल्हापूर ) पोलीस ठाण्याचे ताब्यात  देण्यात आले आहे.

आंतरराज्य रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्वालासिंग टोळीचा म्होरक्या ज्वालासिंग कंजारभाट हा आंतरराज्य रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्रासह परराज्यात खुनासह दरोडा , जबरी चोरी असे सुमारे १५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते . त्या काळात त्याच्या टोळीने लूटमारीचा सपाटाच लावलेला होता . ते गुन्हे केल्यानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फरार व्हायचे. त्यामुळे मिळून येत नसल्याने पोलीसही हैराण झाले होते. आपला एन्काउंटर होईल या भीतीने ज्वालासिंग १९९९ मध्ये पोलीसांना शरण आला होता. सध्या तो शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यात येरवडा तुरुंगात आहे.

Previous articleकोरोणा मुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणार – खासदार डॉ.अमोल कोल्हे
Next articleदिवे घाटात १९ वर्षीय तरुणीचे अपहरण