मारहाण व विनयभंग केल्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

सोसायटीचे नाव सातबारावर का लावून देत नाही या कारणावरून नारायणगाव येथील विघ्नहर संकुल मध्ये राहणाऱ्या कनिका कपिल खैरे व त्यांचे पती कपिल चंद्रकांत खैरे यांना दमदाटी शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल सात जणांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कनिका कपिल खैरे (वय ३३) यांनी दि. २ जुलै रोजी दिली असल्याची माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

विघ्नहर संकुल सोसायटी मधील महिलेला दिनांक २४ जून रोजी जातीवाचक शिवीगाळ करून तसेच अपमानास्पद वागणूक देऊन धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून नारायणगाव येथील व्यवसायिक कपिल चंद्रकांत खैरे व कनिका कपिल खैरे या उभयतांवर अनुसूचित जाती जमाती कायदा ॲट्रॉसिटी अंतर्गत नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा गुन्हा धादांत खोटा असल्याची माहिती खैरे दांपत्याने नारायणगाव पोलिसांना दिली.

दरम्यान विघ्नहर संकुल येथील रहिवासी, व्यवसायिक आणि दांपत्यावर गुन्हा दाखल केला ते सहा सात जण आणि खैरे दांपत्य यांचे काही ना काही कारणावरून पूर्वीपासूनच वाद आहेत. त्यात आता बिल्डरने उडी घेतली असून,बिल्डर आणि सोसायटीतील काही जण एकत्र येऊन आमच्याशी वाद घालतात. दिनांक २४ जून रोजी रात्री आठ वाजता आमच्यावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाल्याने आम्ही परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यां विरुद्ध फिर्याद दिली आहे. असे फिर्यादी कनिका कपिल खैरे म्हणाल्या. आमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा ज्या दिवशी रात्री आठ वाजता दाखल झाला. व ज्यांनी गुन्हा दाखल केला त्या राजश्री नंदू कांबळे या मुळात विघ्नहर सोसायटीत उपस्थित नव्हत्या.
तसेच ज्यांनी साक्ष दिली त्या तर त्याचवेळी जयहिंद पॅलेसला सहा ते सव्वा आठ पर्यंत बिल्डरच्या मीटिंगमध्येच होत्या. आणि कपिल खैरे देखील तेथे नसून त्यांच्या व्यवसायात व्यस्त होते.

त्याबाबतचे त्या महिलांचे व कपिल खैरे यांचेही सीसीटीव्ही फुटेज आम्ही मिळवले असल्याचे कनिका खैरे यांनी सांगितले.
दरम्यान मी, पल्लवी नवले व लता कुंभार बोलत असताना या घटनेतील आरोपी राजेंद्र यशवंत इंदोरे, गजेंद्र कवडे, समीर कचन, अलका गजेंद्र कवडे, सोनाली काळे, राजश्री नंदू काळे व प्रगती नवले (सर्व रा. विघ्नहर संकुल नारायणगाव) यांनी सोसायटीच्या पार्किंग मध्ये येऊन आमच्या सोसायटीचे नाव सातबारावर का लावून देत नाही या कारणावरून मला शिवीगाळ व दमदाटी केली त्याचवेळी राजेंद्र इंदोरे यांनी माझ्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असे कनिका खैरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
वरील सात आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३५४,३२३,१४३,१४७,१४९,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे करीत आहेत.

Previous articleधामणी,शिरदाळे,पहाडरा परिसरातील शेतकरी करतोय कोरड्यात पेरणी
Next articleमारहाण प्रकरणी नारायणगावात हॉटेल चालकावर गुन्हा दाखल