धामणी,शिरदाळे,पहाडरा परिसरातील शेतकरी करतोय कोरड्यात पेरणी

लोणी – मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुक्यात अजून पुरेसा पाऊस झालेला नाही परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसाच्या आधारावर लोणी धामणी,शिरदाळे,पहाडदरा परिसरातील शेतकरी कोरड्यातच पेरणी करत असून भविष्यात पाऊस होईल आणि आपले पीक येईल अशा भाबड्या आशेवर बसले आहेत.परंतु महागाई आणि दुष्काळ यामध्ये शेतकरी अडकला असताना कोरड्यात पेरणी म्हणजे एक प्रकारे जुगार शेतकरी खेळत असल्याचे धामणी येथील प्रगतशील शेतकरी आनंदा जाधव यांनी सांगितले.

लोणी धामणी परिसर हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते परंतु जुलै उजाडला तरी पावसाचा पत्ता नसून अजून आठ दिवसात पाऊस झाला नाही तर पेरणी केलेलं बियाणे देखील खराब होऊन जाईल अशी माहिती शिरदाळे उपसरपंच मयुर सरडे,धामणी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे,लोणी चे सरपंच उर्मिला धुमाळ यांनी सांगितले.

गेल्या वर्षी आता पर्यंत १००% पेरणी झाली होती तसेच शिरदाळे परिसरात होणारी बटाटा लागवड देखील संपूर्ण झाली होती. यंदा मात्र पाऊस नसल्याने बटाट्याचे आगार असलेले शिरदाळे येथील शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण पाहता बटाटा लागवड घटण्याची शक्यता आहे.तसेच खतांचे वाढलेले भाव आणि बियाणे हा खर्च देखील परवडणारा नसून शेतकरी फक्त काही तरी शेतात करायचे म्हणून पीक घेत असतात असे प्रगतशील शेतकरी बाबाजी चौधरी, निवृत्ती मिंडे,राघू रणपिसे,सुरेश तांबे या शेतकऱ्यांनी सांगितले.

या वर्षी हवामान खात्याने देखील कमी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये जेणेकरून दुबार पेरणीचे संकट उभे राहील. खतांची आणि बियाणांची किंमत पाहता हे शक्य देखील नसल्याने शेतकऱ्यांनी विचार पूर्वक निर्णय घ्यावा.अशी माहिती शिरदाळे गावचे उपसरपंच मयुर सरडे यांनी दिली.

Previous articleघोडेगाव स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न
Next articleमारहाण व विनयभंग केल्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल