ऋतिक गोंधळी यांचा संशयास्पद मृत्यू: संशयास्पद मृत्यू झाला असल्याचा युवकाच्या नातेवाईकांचा आरोप

नारायणगाव :- (किरण वाजगे)

नारायणगाव येथील एका युवकाची मलेशिया येथे मर्चंट नेव्ही मध्ये नोकरीवर कार्यरत असताना संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.नारायणगाव (ता. जुन्नर) येथील गुरुवर्य सबनिस विद्यामंदिरात कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ सुनील गोविंद गोंधळी (रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) यांचा २३ वर्षाचा मुलगा ऋतिक गोंधळी याला ओशियन गॅलेक्सी प्रोफेशनल करिअर फाउंडेशन नारायणगाव या एजन्सी मार्फत काही दिवसांपूर्वी मलेशिया येथे मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी मिळाली होती. या खाजगी फाउंडेशनचा मालक निखिल राजू मोरे सध्या राहणार नारायणगाव यांनी दोन लाख रुपये घेऊन १९ मे २०२३ रोजी मलेशिया देशातील मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी दिली होती मलेशिया देशात गेल्यानंतर तात्काळ २० मे रोजी त्याला नोकरीवर रुजू करणे अपेक्षित असताना तेथेच जवळपास २० दिवस खाजगी हॉटेलवर त्याला ठेवण्यात आले.

त्यादरम्यान मलेशियातील एजंटला मयत ऋतिक याने नोकरीवर रुजू होण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून व एजंट मोरे कडून उडवा उडवीची उत्तरे येऊ लागले त्यानंतर दिनांक ९ जून रोजी ऋतिक याला मलेशियातील मर्चंट शिपवर जॉब नोकरी मिळाली त्यानंतर त्याला दिलेल्या नियुक्तीमध्ये ज्या पदावर नियुक्त करण्यात आले होते त्यासाठी कमीत कमी त्या कामाचा पाच ते सात वर्षाचा अनुभव असावा लागतो तो त्याच्याकडे नव्हता तरी त्याला त्या पदावर रुजू करण्यात आले परंतु प्रत्यक्षात ज्या व्यापारी जहाजावर त्याला नोकरी द्यायला हवी होती ती न देता खूप जुन्या छोट्या बोटीवर त्याला पाठवण्यात आले हे करत असताना त्याला कॉन्ट्रॅक्ट लेटर दिले गेले नाही त्यामुळे आपल्या मुलाला जे काम देण्यात आले होते ते पूर्णपणे चुकीचे होते असा आरोप ऋतिक गोंधळीच्या वडिलांनी नारायणगाव पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत केला आहे त्यानंतर १६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता जहाजावर काम करत असताना ऋतिक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला असल्याचे एजंट निखिल राजू मोरे यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जून रोजी सायंकाळी सहा वाजता सांगितले. जर त्याचा मृत्यू १६ तारखेला झाला असेल, आणि त्याची माहिती १७ जून रोजी देण्यात येत असेल तर हा घातपात तर नसेल ना, या व इतर कारणांमुळे माझ्या मुलाचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याचे सांगून संबंधित एजंट निखिल राजू मोरे व इतर दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ज्ञानेश्वर गोंधळी यांनी नारायणगाव पोलिसांना तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

दरम्यान १६ जून रोजी मृत्युमुखी पडलेल्या ऋतिक चा मृतदेह सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर भारतात यायला २९ जून म्हणजेच तब्बल १४ दिवस लागले. यादरम्यान त्याचे आई-वडील नातेवाईक मित्रपरिवार यांना मोठा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.

अशाप्रकारे परदेशात नोकरीचे आमिष दाखवून अनेक युवकांना फसवण्याचे षडयंत्र काही बनावट एजंट करीत आहेत. यासाठी युवकांनी केवळ आमिष आहे हे न पाहता सर्व गोष्टींची चौकशी करूनच नोकरीसाठी परदेशात जाणे गरजेचे आहे.

दरम्यान मुंबई येथील विमानतळावर ऋतिक याचा मृतदेह आणण्यासाठी गेलेल्या राजेंद्र मोरे, वैभव जठार, भूषण शिवले व सुरज सिंग या युवकांना विमानतळावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, दर महिन्याला मलेशिया देशातून फसवणूक झालेल्या एका तरी युवकांचा मृतदेह भारतात येतो. आणि त्यांची सातत्याने अशाप्रकारे फसवणूक होत आहे.

गुरुवार दिनांक २९ जून रोजी सकाळी ऋतिक याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक, कृषी आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous articleआषाढी वारीच्या निमित्ताने वडजाई जिल्हा परिषद शाळेत “विठ्ठल नामाची शाळा भरली”.
Next articleघोडेगाव स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न