महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आणली अनोखी टुर पॅकेजीस (प्रवास सहली) पर्यटकांच्या सेवेत

पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेला आपला महाराष्ट्र पर्यटनाच्या इतिहासात एक नवीन आणि रोमांचक अध्याय उलगडणार आहे. महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठया प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत 75 टुर पॅकेज पर्यटकांच्या सेवेत आणली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्षांत अर्थात 1 मे 2023 रोजी याचा शुभारंभ केला आहे.

राज्याचे दुरदृष्टी असलेले पर्यटन, कौशल्य विकास, उद्योजकता, महिला आणि बाल विकास या विभागाचे मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या पर्यटन उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने आणि पर्यटनाला नवीन चालना देण्याच्या दृष्टीकोनातून या टुर पॅकेजची आखणी करण्यात आली आहे. प्रधान सचिव (पर्यटन), सौरभ विजय सर आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, श्रध्दा जोशी – शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे टुर पॅकेज संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे पासून सुरु करण्यात आले आहेत.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करताना हे टूर पॅकेज पर्यटकांना आयुष्यभरासाठी संस्मरणीय अशा अनुभवात्मक प्रवासात घेऊन जाणार आहेत.

महाराष्ट्र – निसर्गरम्य सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचा खजिना असलेल्या महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे, सुमारे 400 किल्ले आणि 900 हून अधिक कोरीव लेणी यामुळे महाराष्ट्र हा निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचा खजिना बनले आहे. सह्याद्री पर्वतराजीपासून ते गूढ लोणार सरोवरापर्यंत आणि थेट आकाशाला गवसणी घालणाऱ्या कळसूबाई शिखरापासून ते कोकणातील प्राचीन समुद्रकिनाऱ्यांपर्यंत प्रत्येक पर्यटकाला देण्यासाठी राज्याकडे भरपुर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठेवा आहे.

महाराष्ट्रातील अद्वितीय आकर्षण असलेली जागतिक वारसा स्थळे अजिंठा आणि एलोरा लेणी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाचा पुरावा आहेत, तर कोकणातील गणपतीपुळे आणि तारकर्ली हे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणे बनले आहेत. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आणि विदर्भातील वन्यजीव, नाशिकमधील मंदिरे आणि पुण्यातील सांस्कृतिक वारसा, गड किल्ले ही अद्वितीय आकर्षणे आहेत जी महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा वेगळे करतात.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातील पर्यटक निवासांचे जाळे पर्यटकांच्या वाढत्या संख्येची पूर्तता करण्यासाठी तत्पर आहेत. पर्यटकांच्या सेवेसाठी MTDC ने राज्यभर पर्यटक निवासे आणि उपहारगृहांची निर्मिती केली आहे, ज्यात निवास व्यवस्था, खाण – पान, रुचकर भोजन यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. औरंगाबाद विभागातील छत्रपति संभाजी नगर, लोणार, अजंठा, फर्दापुर, कोकणातील तारकर्ली, गणपतीपुळे, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, पुणे विभागातील माथेरान, माळशेज घाट, कार्ला, पानशेत, कोयना, महाबळेश्वर, नाशिक विभागातील भंडारदरा, शिर्डी, ग्रेप पार्क, नागपुर विभागातील ताडोबा, पेंच, बोधलक्ष, नागपूर, आणि चिखदरा, तसेच मुबईजवळील खारघर, एलिफंटा, टिटवाळा ही पर्यटक निवासे पर्यटकांना अतिउत्तम दर्जाच्या सेवा “अतिथी देवो भव” या भावनेने देत आहेत.
महामंडळाने जाहीर केलेल्या या टुर पॅकेजेस अनुभवात्मक पर्यटनाबरोबरच पर्यटकांना आयुष्यभराच्या अनुभवात्मक प्रवासात घेऊन जाणे, पर्यटकांचा महाराष्ट्रातील अद्वितीय आकर्षणांचा अनुभव वाढवणे अशी उद्दीष्टे समोर ठेवुन तयार करण्यात आली आहेत. या पर्यटन पॅकेजमध्ये कोकणातील अनोखे नयनरम्य समुद्रकिनारे, ताडोबा मधील वन्यजीव, भंडारदरा येथील नैसर्गिक सौंदर्य, पर्वतारोहण, अंतराळ निरीक्षण आणि जंगल सफारीची झलक मिळते. अजंठा आणि वेरूळच्या जागतिक लेण्यांचा नेत्रसुखद अनुभव घेण्यापासुन उल्कापातापासुन तयार झालेल्या लोणार सरोवराचा इतिहासही याची “देही याची डोळा पाहता” येणार आहे. पर्यटकांना पर्यटनाचा आणि पर्यटन स्थळांचा जास्तीत जास्त अनुभव देण्यासाठी पॅकेजमध्ये गाईडही असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील गडकोट आणि किल्ल्यांचा रोमांचकारी इतिहास पर्यटकांच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित करणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने रोहन ट्रॅव्हल्स, अकबर ट्रॅव्हल्स आणि आर.के. Associates and Hoteliers Pvt Ltd. या टूर ऑपरेटर्सच्या सहकार्याने खास टूर पॅकेजेस सादर करताना पर्यटकांच्या सर्व सेवा प्रकारच्या प्रवासाच्या गरजा जसे कि वाहतूक आणि निवास आरक्षणे पूर्ण करणे हा आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर (www.mtdc.co) या सर्व टुर पॅकेजेसची संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या पर्यटन उद्योगाचे पुनरुज्जीवन – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला विश्वास आहे की या टूर पॅकेजेसच्या प्रारंभामुळे राज्याच्या पर्यटन उद्योगाला आवश्‍यक चालना मिळेल. हा एक असा उपक्रम आहे ज्याचा उद्देश पर्यटकांना महाराष्ट्राचा गौरवशाली आणि प्राचीन इतिहास, त्यांचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा आणि राज्याचे अद्भुत निसर्ग सौंदर्य जाणून घेण्याची संधी देणे असा आहे. महामंडळाला विश्वास आहे की ही टूर पॅकेजेस पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करतील आणि महाराष्ट्राच्या पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवन करण्यास मदत करतील असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.

Previous articleदौंड शहरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांनी संपन्न
Next articleनागेश्वर विद्यालयात एकविस वर्षानंतर मैत्रीला आले उधान … !