भीमा नदीपात्रात पाच दिवसात एकाच कुटुंबातील आढळले चार जणांचे मृतदेह ; ३ लहान मुले बेपत्ता

योगेश राऊत , पाटस

पारगाव (ता. दौंड ) ग्रामपंचायत हद्दीतील भीमा नदीपात्रात सलग पाच दिवसात एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर या कुटुंबातील ३ लहान मुले अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे दौंड तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या पारगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत भीमा नदीच्या पात्रात १८ जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर २०, २१ व २२ जानेवारीला असे एकापाठोपाठ तीन मृतदेह आढळून आले.
भीमा नदीच्या पात्रात मागील पाच दिवसात एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळून आले आहेत. या मृतदेहाची ओळख पटलेली असून हे मृतदेह आढळून आल्यानंतर नातेवाईकांनी यवत पोलीस ठाण्यात आक्रोश केला.

दरम्यान, या कुटुंबातील आणखी तीन लहान मुले बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांनी यवत पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे उपस्थित होते.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोयल यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहीमेसाठी तैनात केली आहेत. तसेच ही आत्महत्या आहे की, अपघात आहे, की घातपात, याबाबतही यवत पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Previous articleशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कानगाव येथे स्वच्छता अभियान
Next articleशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेना- युवासेनेच्या शाखेचे वारजे येथे दिमाखात उद्घाटन