अनैतिक संबंधातून महिलेचा खून ; माव्याची पुडी व ओढणीच्या बारकोड मुळे खूनाच्या गुन्ह्याची उकल

नारायणगाव : (किरण वाजगे)

महिलेच्या मृतदेहाजवळ आढळलेली माव्याची पुडी तसेच महिलेने परिधान केलेल्या ओढणीवर असलेल्या बारकोड मुळे अवघ्या दोन दिवसात विवाहित तरुणीच्या खूनाची उकल करण्यात नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिसांना यश आले आहे.
शुक्रवार दिनांक १३ रोजी वडामाथा, कांदळी (ता. जुन्नर) येथे एका अज्ञात महिलेचा खून झाला असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर केवळ दोन दिवसातच या महिलेचा खून करणाऱ्या दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी शिताफीने तपास करून ताब्यात घेतले .

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दिनांक १३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कांदळी येथील वडामाथा येथील चवळीच्या शेतामध्ये ३० वर्षे वयाच्या एका अज्ञात महिलेचा मृतदेह तेथील शेतमजुरांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तसेच पंचनामा केल्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी खूनाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस पथके नगर येथे पाठवली.
महिलेने परिधान केलेल्या ओढणीवर असलेल्या बारकोडवर सुविधा मार्केट, नगर असे नाव आढळून आले. तसेच मृतदेहाजवळ पडलेल्या माव्याच्या पुडीवरून ही महिला नगर येथून आली असावी या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला.
तांत्रिक माहिती वरून या गुन्ह्यातील आरोपी शुभम मनोज गुळसकर (वय २२, रा. बोल्हेगाव, जि. नगर) यास ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने खून झालेल्या महिलेला मोटरसायकलने नगर वरून कांदळी येथे दिनांक १२ रोजी सायंकाळी घेऊन आल्याचे सांगितले. त्याचा साथीदार मिथिलेश डोमी यादव (हल्ली रा कांदळी औद्योगिक वसाहत, मूळ राहणार मिरजावा, तालुका त्रिवेणीगंज बिहार) व गुळसकर याच्याकडे चौकशी केली असता मयत अनोळखी महिलेचे नाव सुनिता देवी शिवकुमार यादव (वय अंदाजे ३० सध्या राहणार माताजी नगर, एमआयडीसी नागापूर, नगर, मुळ रा.मिरजावा तालुका त्रिवेणीगंज, जिल्हा सुपोल राज्य बिहार) असल्याचे आरोपी गुळसकरने सांगितले.
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींककडे चौकशी केली असता मागील एक वर्षापासून त्या महिलेबरोबर दोन्हीही आरोपींचे प्रेमसंबंध होते. मयत महिला वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे वरील दोन्ही आरोपींनी संगणमत करून तिला तिच्याच गळ्यातील ओढणीने ठार केले असल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली.

अजूनही न्यायालयात दोन्ही आरोपींना हजर केले असता न्यायालयांनी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे सुनावली आहे.

आरोपींना यशस्वीपणे पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांच्यासह उपनिरीक्षक सुनील धनवे विनोद दुर्वे गणेश शाखेचे उपनिरीक्षक जगदाळे पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे पोपट मोहरे दिनेश साबळे, सचिन कोबल, श्री हासे, अविनाश वैद्य, शैलेश वाघमारे, दत्ता ढेंबरे यांनी यशस्वी प्रयत्न केले या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे करीत आहेत.

Previous articleगुरुवर्य सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नारायणगाव येथील व्यावसायिक शाखेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सन्मान
Next articleमंचर येथील साई फाउंडेशनच्या तर्फे अपंग महिलेला शिलाई मशिन भेट