गुरुवर्य सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नारायणगाव येथील व्यावसायिक शाखेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सन्मान

नारायणगाव : (किरण वाजगे)

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे यांच्यामार्फत यशस्वी उद्योजक विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान नुकताच करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर औंध (पुणे) येथे हा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. यामध्ये व्यावसायिक विभागातील हॉर्टिकल्चर शाखेचा विद्यार्थी जयसिंग शांताराम वायकर व ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी शाखेचा विद्यार्थी अक्षय बाळासाहेब कोल्हे यांना यशस्वी उद्योजक म्हणून स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रा. अनिल गायकवाड, प्रा. बाळासाहेब भुजबळ, प्रा. सुनील गिरमे व डॉ. सत्यवान थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या डॉ. स्वाती मुजुमदार व महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या स्मिता घैसास यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी उपसंचालक यतीन पारगावकर, पुणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर शिंपले, भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.

जयसिंग वायकर यांनी द्राक्ष शेतीमध्ये फार मोठे काम उभे केले आहे. परिसरातील शंभर पेक्षा अधिक बेरोजगारांना कामाची संधी उपलब्ध करून दिली आहे. दर्जेदार द्राक्ष उत्पादन करून तो मोठ्या प्रमाणात निर्यात करीत आहे. अभिनव द्राक्ष बागातदार संघामध्ये तो संचालक म्हणून कार्यरत आहे. परिसरातील द्राक्ष बागांना तो मोलाचे मार्गदर्शन करीत आहे. तसेच अक्षय कोल्हे याने मंचर या ठिकाणी अक्षय ऑटोमोबाईल या नावाने दुचाकी टी.व्ही.एस. वाहनांचे विक्री व सेवा करण्याचे शोरूम सुरू केले आहे. परिसरातील १० पेक्षा अधिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा स्वतःच्या चिकाटीने अक्षयने हे विशेष यश संपादन केले आहे.वरील दोन्हीही उद्योजकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शासनाच्या वतीने स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपाध्यक्ष सुजित खैरे व सर्व संस्थेचे पदाधिकारी यांनी संबंधित विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक यांनी दिली.

Previous articleनॅशनल जम्बोरीत मराठा स्कूल व एस एस एम मोहनबाई चुनीलाल मेहता गर्ल शाळेचा सहभाग
Next articleअनैतिक संबंधातून महिलेचा खून ; माव्याची पुडी व ओढणीच्या बारकोड मुळे खूनाच्या गुन्ह्याची उकल