यवत खुटबाव मार्गावर भीषण अपघातात दोघांचा कार खाली चिरडून मृत्यु ,एक जखमी

योगेश राऊत,पाटस

यवत – ते खुटबाव रस्त्यावरील खुटबाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील साळोबा वस्ती येथे पायी जाणाऱ्या तीन नागरिकांना चारचाकी गाडीने धडक दिल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ज्ञानदेव लाला खंकाळ (वय – ६४), ज्ञानदेव गुलाब शेळके (वय ४०, रा. दोघेही रा. खुटबाव साळोबावस्ती ता. दौंड जि. पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर बाळु सखाराम शिंदे ( रा. खुटबाव साळोबावस्ती ता. दौंड) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी आकाश ज्ञानदेव खंकाळ (वय – ३५, रा. खुटबाव साळोबावस्ती ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी चालक आकाश अनिल जगताप (रा. यवत ता. दौंड जि. पुणे) याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ०६ ) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खुटबाव (ता. दौंड, पुणे) या गावच्या हद्दीतील साळोबा वस्ती येथून खंकाळ, शेळके, शिंदे हे तिघेजण पायीचालात चालले होते. यावेळी पाठीमागून चारचाकी चालक आकाश जगताप हा चारचाकी गाडी खुटबाव बाजुकडुन यवत बाजुकडे भरधाव वेगाने चालवित निघाला होता.यावेळी रस्त्याने चालत निघालेल्या तिघांना पाठीमागून चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये ज्ञानदेव खंकाळ, व गुलाब शेळके यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर बाळू शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, आरोपीने या जखमींना कोणत्याही प्रकारची मदत न करता भरधाव वेगाने तसाच पुढे निघुन गेला. फिर्यादी आकाश खंकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आकाश अनिल जगताप याच्या विरुध्द यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे हे करीत आहेत.

Previous articleकुकडी धरण प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार
Next articleमाध्यमिक शाळांमध्ये  निर्भया जनजागृतीची गरज – प्रा.सुरेश वाळेकर