कुकडी धरण प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार

नारायणगाव (किरण वाजगे)

कुकडी धरण प्रकल्प अंतर्गत जुन्नर तालुक्यातील साकोरी शिवारात कुकडी डावा कालवा नुकताच फुटल्याने शेतात पाणी जाऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कुकडी डावा कालवा किलोमीटर क्रमांक २० मध्ये मंगळवार (दि. ३) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कालवा फुटल्याने कालव्याचे पाणी साकोरी शिवारात गेले व शेतमालाचे नुकसान झाले. तसेच येथील ओढ्याला पूर देखील आला. कुकडी धरण प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार सुरू असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी म्हणजे २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खोडद येथील मीना शाखा कालव्याचे किलोमीटर क्रमांक ७ येथे कालवा फुटून या भागातील कांदा, ऊस, द्राक्ष इत्यादी शेतमालाचे नुकसान झाले. त्यानंतर काही दिवसातच येडगाव धरणातून कुकडी कालव्याचे पाणी सोडण्यात आले असताना साकोरी गावाजवळ किलोमीटर क्रमांक २० मध्ये कालवा फुटला. याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर व विभागीय अभियंता रावळे यांना मिळाली असता त्यांनी या कालव्याचे पाणी तातडीने बंद करून घटनास्थळी भेट दिली.

या संदर्भात कालव्या लगतच्या शेतकऱ्यांनी सांगितले की कालव्याच्या अस्तरीकरणात उगवलेली मोठमोठे झाडे त्यांची खोलवर गेलेली मुळे, यामुळे कालवा ठिसूळ झाला आहे. कालवा फुटीचे सूत्र सुरूच राहणार असल्याने व झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची नुकसान भरपाई कुकडी धरण प्रकल्प अधिकाऱ्यांनी मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी विलास मुळे व इतर शेतकऱ्यांनी दिली.

Previous articleपत्रकार दिनानिमित्त जुन्नर वन विभागाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
Next articleयवत खुटबाव मार्गावर भीषण अपघातात दोघांचा कार खाली चिरडून मृत्यु ,एक जखमी