पत्रकार दिनानिमित्त जुन्नर वन विभागाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

किरण वाजगे ,नारायणगाव

जुन्नर तालुक्यातील पत्रकारांनी वास्तव बातम्या मांडल्यानेच तालुक्याचे नाव मोठे झाले असल्याचे प्रतिपादन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले. जुन्नर तालुक्यात व परिसरात मानव आणि बिबळ्या यामध्ये पूर्वीपेक्षा आता संघर्ष कमी झाला आहे. मानव व बिबट सहजीवन सध्या एकत्रितपणे सर्वत्र पाहायला मिळत असल्याचे मत देखील जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी मांडले.बिबट निवारा केंद्र, माणिकडोह येथे जुन्नर वनविभागाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अतुल बेनके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, संदेश पाटील, वनक्षेत्रपाल अजित शिंदे, वैभव काकडे, एस ओ एस संस्थेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवणे, सहाय्यक महेंद्र ढोरे, वनपाल नितीन विधाटे, नारायण राठोड, तसेच तालुक्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार उपस्थित होते.

आमदार अतुल बेनके यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व वन विभाग मार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांनी प्रस्तावित कामे व्यवस्थित करावी अशा सूचना दिल्या.

या कार्यक्रमास उपवनसंरक्षक सातपुते यांनी प्रस्तावित बिबट सफारी तसेच वनविभागामार्फत सुरू असलेली विविध कामे प्रस्तावित प्राणी संग्रहालय तसेच मानव बिबट संघर्ष या विषयी माहिती दिली. याप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदन सनवे यांनी बिबट्याचे या भागातील अस्तित्व, त्याची दिनचर्या, बिबट्याचे स्वभाव गुण तसेच बिबट्या जखमी झाल्यानंतर व पिंजऱ्यामध्ये अडकल्यानंतर त्याची कशाप्रकारे देखभाल व त्याच्यावर कसे उपचार केले जातात याविषयीची इत्तंभूत माहिती दिली.

यावेळी माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये जखमी बिबट्यांवर कशा पद्धतीने येथील रुग्णालयात उपचार केले जातात. तसेच बिबट्या अडकल्यानंतर किंवा विहिरीत पडल्यानंतर त्याला कसे रेस्क्यू केले जाते त्यासाठी कोणती उपकरणे वापरली जातात. तसेच ट्रॅक्युलाईज गन कशी वापरली जाते, डाट कसा दिला जातो याविषयीची माहिती यावेळी सर्व पत्रकारांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले तर आभार वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी मानले.

Previous articleभारतीय पत्रकार संघाच्या वतीने दौंड येथे पत्रकार दिन साजरा
Next articleकुकडी धरण प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार