फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ; केडगावच्या नोंदणी कार्यालयातील प्रकार

योगेश राऊत पाटस

मृत जमीनमालकांना जिवंत दाखवून केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीच्या खरेदी – विक्रीचा व्यवहार करून फसवणूक केली . दौंड तालुक्यातील पाटस येथे हा धक्कादायक प्रकार घडला . याप्रकरणी मृत जमीनमालकाच्या वारसांनी पुणे ग्रामीणच्या सहजिल्हा निबंधकांकडे कारवाई करण्यासाठी तक्रार अर्ज सादर केला आहे . – पाटस येथील गट क्रमांक १३७ मधील पोटहिस्से २३ , १५ , ८ , २० , १३ व १८ चे अनुक्रमे जमीनमालक बाळू दगडू भंडलकर , रमेश गोपीनाथ चव्हाण , दिलीप नामदेव सोनवणे , लक्ष्मण बारकू माखर , गंगूबाई दगडू लोणकर , सुमन तुकाराम बायदंड असून  त्यांचा मृत्यू झाला आहे .

या जमीनमालकांनी जमिनीवरील अतिक्रमणापासून संरक्षण , मशागत करणे , पीक घेऊन विक्री करणे , जमीन विकसित करणे या कारणांसाठी जमिनीचे अधिकृत अधिकार देण्यासाठी मुखत्यारपत्र लिहून दिले होते . यानंतरच्या काळात जमीनमालकांचा आजारपणामुळे मृत्यू झाला . जमीनमालकांचा मृत्यू झाल्याने मुखत्यारपत्राने मिळालेले अधिकार संपुष्टात आले . केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करीत असताना विलासचंद्र शिवराम तांदळे यांनी जमीनमालक जिवंत असल्याची खोटी माहिती घोषणापत्रात देऊन
परस्पर खरेदीखत करीत जमिनीची विक्री केली .

तांदळे यांनी जाणीवपूर्वक चुकीची व खोटी माहिती देत वारसांची व दुय्यम निबंधकांची फसवणूक केली आहे . त्यामुळे नोंदणी अधिनियम १ ९ ०८ कलम ८२ अन्वये दोषींवर कारवाईची मागणी मृत जमीनमालकांच्या वारसांनी मे २०२२ मध्ये जिल्हा निबंधकांकडे केली . पण अद्यापि कारवाई झाली नसल्याचे तक्रारदारांनी सांगून नाराजी व्यक्त केली आहे . याबाबत पुणे ग्रामीणचे सहजिल्हा निबंधक दीपक पाटील यांच्याशी संपर्क झाला नाही .

Previous articleमहाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या नियोजन विभागाच्या अधिकार्‍यांचा टेकवडी गावाला अभ्यास दौरा
Next articleसख्ख्या मुलाने नव्हे तर पतीनेच केला खून ; गतिमंद मुलावर ठेवला होता आरोप