सख्ख्या मुलाने नव्हे तर पतीनेच केला खून ; गतिमंद मुलावर ठेवला होता आरोप

(नारायणगाव : किरण वाजगे)

शिरोली तर्फे आळे (ता.जुन्नर) या ठिकाणी मंगळवार दिनांक १५ रोजी झालेल्या महिलेच्या खुनाचा मुख्य सूत्रधार मुलगा नसून मयत महिलेचा पतीच निघाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याचे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले.

दि १५ नोव्हेंबर रोजी शिरोली तर्फे आळे या ठिकाणी तंबाखूला पैसे दिले नाही म्हणून मुलाने रागाच्या भरात आईच्या डोक्यात खोरे घालून खून केल्याची घटना घडली होती या घटनेत अंजनाबाई बारकु खिल्लारी वय ६० यांचा मृत्यू झाला त्यानंतर नारायणगाव पोलिसांनी सदर घटनेतील आरोपी मयत महिलेचा मुलगा अमोल बारकु खिल्लारी वय २३ यास अटक केली होती व त्याने तसा कबुली जबाबही दिला होता. व याबाबतची फिर्याद अमोल याचे वडील व मयत महिलेचे पती बारकू सखाराम खिलारी (वय ६६ वर्ष) यांनी दिली होती.

दरम्यान,पोलिसांनी या खूनातील तपासाची चक्रे अनोख्या पद्धतीने फिरवली असता आरोपी बारकू यांनी पोलिसांना दिलेल्या उत्तरात विसंगती आढळली. त्यातच त्यांचा मुलगा अमोल हा गतिमंद असल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे यांनी पोलिसी खाक्या दाखवताच ह्या खुनातील फिर्यादी म्हणजेच मयत महिलेचे पती बारकू सखाराम खिलारी हाच आरोपी असल्याचे तपासात सिद्ध झाले व त्याने तसा कबुली जबाबही दिला.

सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार या खुनात निष्पन्न झालेला आरोपी बारकु खिलारी यावर कर्ज झाले होते व त्याला तेथील शेतजमीन विकून दुसरीकडे स्थलांतरित व्हायचे होते. यावरून अंजनाबाई व बारकू या पति पत्नींमध्ये नेहमीच वाद होत होते. १५ नोव्हेंबर रोजी अशाच वादातून बारकू याने प्रथम अंजनाबाई यांच्या दिशेने विळा फेकून मारला तो त्यांच्या तोंडाला लागला त्यानंतर पुढे जाऊन भांडण अधिक विकोपाला गेले व रागातून बारकू याने बायकोच्या डोक्यात खोरे घालून तिला ठार केले. आपला मुलगा गतिमंद असल्याचे त्याला माहीत असल्यामुळे त्याने मुलाला ‘तू पोलिसांना मी सर्व काही केले असे म्हण’ बाकी मी सांभाळून घेतो म्हणून कपडे घालून बाहेर निघून गेला व मुलानेच खून केल्याचा बनाव केला. मात्र तपासाअंती बारकू हाच खुनी निघाला. पोलिसांनी त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करत आहेत.

Previous articleफसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ; केडगावच्या नोंदणी कार्यालयातील प्रकार
Next articleलिटिल जंक्शन स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद